
मिठबाव येथील प्रसाद लोके यांचा दोन दिवसांपूर्वीच मुणगे मशवी रस्त्यावर निर्घृणपणे खून झाला. त्यानंतर दोन दिवसांनी प्रसाद लोके याची पत्नी मनवा उर्फ अंकिता प्रसाद लोके यांनी गुरुवारी पहाटे गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच देवगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह शववच्छेदनासाठी देवगड येथे पाठवण्यात आला.
घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मनवा या मिठवाब येथील आपल्या घरी आईसोबत गुरुवारी रात्री झोपल्या होत्या. पहाटे तिच्या आईला जाग आली तेव्हा मनवा बाजूला नसल्याचे लक्षात आले. त्यांनी घरातील सर्वाना उठविले. घरात सर्वत्र शोधाशोध केली असता टेरेसवर शेडच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेतलेल्या स्थितीत मनवा दिसून आली. पतीच्या निर्घृण हत्येनंतर आता पत्नीनेही दोन दिवसांनी आत्महत्या केल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.



























































