
दहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगून आल्यानंतरही पुन्हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची निर्घृण हत्या करणाऱया नराधमाला राजूर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जगन्नाथ भागा आडे (वय 46, रा. शेलविहिरे, ता. अकोले) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी आणि त्याचे कुटुंबीय शेलविहिरे या ठिकाणी राहण्यास आहेत. आरोपीला त्याची पत्नी रंजनाच्या चारित्र्याविषयी नेहमीच संशय असायचा. यापूर्वीही त्याने रंजनावर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते. यात त्याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. आरोपी शिक्षा भोगून 2011 मध्ये तुरुंगातून बाहेर आला. त्यानंतर त्याने पुन्हा रंजनाशी संसार थाटला. दरम्यान, 19 मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आरोपीने पुन्हा पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिच्या डोक्यात खोरे आणि टिकावाच्या दांडय़ाने मारहाण करून तिचा खून केला. यानंतर तो पसार झाला होता.
तेव्हापासून राजूर पोलीस हे त्याच्या शोधात होते. तपासात मिळालेल्या तांत्रिक माहितीवरून जगन्नाथ भागा आडे हा रांजणगाव (ता. शिरूर, जि. पुणे) येथे वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागिय पोलीस अधिकाऱयांच्या पथकाने रांजणगाव येथे शोध घेऊन आरोपीला अटक केली. याप्रकरणी त्याचा मुलगा जालिंदर आडे याने फिर्याद दिली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस शिपाई अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, गणेश शिंदे, फुरकान शेख, प्रमोद जाधव, हवालदार कैलास नेहे, विजय मुंढे, दिलीप डगळे, अशोक काळे, अशोक गाडे, विजय फटागरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
























































