‘डब्ल्यूपीएल’ महिला क्रिकेटसाठी गेमचेंजर ठरेल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वुमन्स प्रीमियर लीगचा पहिला हंगाम 4 मार्चपासून सुरू होणार आहे. 26 मार्चपर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार असून या दरम्यान पाच संघात एकूण 22 सामने खेळवले जातील. पहिला सामना गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा खेळला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर गुजरात जायंट्सच्या मुख्य प्रशिक्षक राचेल हेन्स म्हणाल्या की, ‘डब्ल्यूपीएल’ महिला क्रिकेटसाठी गेम चेंजर ठरेल.

आमचा संघ समतोल आहे प्रत्येक खेळाडू मैदानात उतरण्यासाठी उत्सुक आहे. सध्या आम्ही खेळाडूंची चांगली मोट बांधत असून दबावातही चांगली कामगिरी करण्याकडे खेळाडूंचे लक्ष असेल, असे हेन्स म्हणाल्या.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय ते देशांतर्गत, अंडर-19 आणि अगदी अनकॅप्ड खेळाडूंपर्यंत, आम्हाला हवे असलेले बहुतेक खेळाडू आम्ही घेतले आहेत. क्रिकेटच्या या प्रकारामध्ये गोलंदाजांसह सलामीवीर आणि अष्टपैलूंची कामगिरीही महत्त्वाची आहे. आम्ही चांगली कामगिरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरू, असे गुजरात जायंट्सची मेण्टॉर मिताली राज म्हणाली.

येत्या 4 मार्चपासून सुरू होणारी डब्ल्यूपीएल 26 मार्चपर्यंत रंगेल. 23 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 22 सामने खेळले जाणार असून सर्व सामने ब्रेबर्न आणि डी. वाय. पाटील स्टेडियमवर होतील. चार दिवस प्रत्येकी दोन-दोन सामने खेळविले जातील.