
अवघ्या पाच महिन्यांत जुना ब्रिटिशकालीन पूल नव्या रूपात वाईकरांच्या सेवेत दाखल झाला आहे. नवीन पुलामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी फुटणार असून, महागणपती पुलावरील भार आता कमी होणार आहे.
अनेक घटनांचा साक्षीदार असलेल्या कृष्णा नदीवरील जुन्या पुलाला 136 वर्षे पूर्ण झाली होती. जड वाहतुकीस तो पूर्णतः धोकादायक बनला होता. तसे पत्रही इंग्लंड सरकारने वाई पालिकेला पाठवले होते. त्यामुळे तो पूल पाडून त्याठिकाणी नवीन पूल उभारणीसाठी आमदार मकरंद पाटील व वाई नगरपरिषद यांच्याकढून निधी मिळवण्यासाठी हालचाली सुरू होत्या. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर या पुलासाठी 15 कोटींचा निधी मंजूर झाला.
त्यानंतर अवघ्या 180 दिवसांत टी अँड टी या कंपनीने हा पूल उभा केला आहे. पुलाची लांबी 83 मीटर असून आणि रुंदी 12 मीटर इतकी आहे. दिवस-रात्र पूल उभारणीचे काम सुरू होते. हा पूल पाडल्याने वाईकरांचे सहा महिने चांगलेच हाल झाले. वाहतुकीसाठी केवळ महागणपती पूल असल्याने पुण्या-मुंबईसारखी वाहतुकीची कोंडी पुलावर होत होती. सिद्धनाथवाडी-गुरेबाजार झोपडपट्टीतून हा पर्यायी तात्पुरता रस्ता करण्यात आला होता. त्या रस्त्यावरही मोठय़ा प्रमाणात वाहनांची, नागरिकांची वर्दळ सुरू होती. प्रत्येकजण नवीन पूल कधी वाहतुकीसाठी खुला होणार याच्या प्रतीक्षेत होता. अखेर गुरुवारी ती प्रतीक्षा संपली.
वाईकरांचे पुलासोबत भावनिक नाते
वाई शहरामधून वाहणाऱ्या कृष्णा नदीवर ब्रिटिश सरकारने 1884 मध्ये (136 वर्षांपूर्वी ) दगडी बांधकामात आकर्षक पूल बांधलेला आहे. शहराच्या दक्षिण उत्तर भागांना जोडणाऱया या कृष्णा पुलामुळे शहर एकमेकाला जोडलेले आहे. या आकर्षक पुलावर अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झालेले होते. स्वातंत्र्य चळवळीतील आंदोलनापासून अनेक सांस्कृतिक, सामाजिक चळवळीशी जोडला गेल्याने त्याचे वाईकरांशी एक भावनिक नातेही तयार झालेले होते.
























































