
सामना प्रतिनिधी । उरण
श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालय कर्मचारी अक्षय कांबळे यांना मारहाण करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले असून, उरण येथील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना याबाबतचे निवेदन राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे उरण तालुका अध्यक्ष डी.टी. केणी यांनी तालुक्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत गुन्हे पोलीस निरीक्षक अतुल आहेर यांच्याकडे सादर केले आहे.
दि.20 जुलै 2019 रोजी रात्री श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले कर्मचारी अक्षय अजित कांबळे यांना रात्रपाळी ड्युटीवर असतांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी मारहाण केली आहे. या घटनेचा जिल्ह्यातील सर्वच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जाहीर निषेध केला असून, त्याचे पडसाद उरणमध्ये उमटले आहे. 21 जुलै रोजी श्रीवर्धन येथे धरणे आंदोलन करण्यात आले. 22 जुलै रोजी निदर्शने करण्यात आली. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून, या प्रकरणातील सर्व गुन्हेगारांवर कारवाई करावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
या बाबतचे निवेदन रायगडचे जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांनाही निवेदन देण्यात आले आहे. मात्र 22 जुलै सायंकाळपर्यंत सर्व आरोपींना अटक न झाल्याने नाईलाजाने 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजल्यापासून जिल्ह्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले असून, त्याचे पडसाद उरणमध्ये उमटले असून, उरणचे सर्व राज्य सरकारी कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी होऊन गुन्हेगारांवर कारवाई होण्यासाठी उरण पोलीसठाण्यात निवेदन सादर केले आहे.

























































