जगातला सगळ्यात भीतीदायक फोन नंबर! ज्याने वापरला त्याचा मृत्यू झाला..

आतापर्यंत एखादी जागा, वस्तू यांबाबत वंदता उठलेल्या आपण ऐकल्या असतील. एखादी जागा विचित्र आहे किंवा वस्तू अयोग्य आहे, असं अनेकदा म्हटलं जातं. पण, एखाद फोन नंबर विचित्र अनुभव देणारा असेल तर? अशाच एका फोन नंबरविषयी भीती पसरली होती, जेव्हा तो नंबर वापरणारे तीन जण लागोपाठ मृत्युमुखी पडले होते.

हा प्रकार जवळपास 10 वर्ष सुरू होता. याची सुरुवात झाली ती बल्गेरिया इथून. इथल्या मोबीटेल नावाच्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने एक फोन नंबर खरेदी केली. 0888888888 हा तो फोन नंबर होता. व्लादमीर गेसनोव नावाच्या त्या अधिकाऱ्याने आपल्या मोबाईल कंपनीचा हा मोबाईल नंबर स्वतःसाठी निवडला होता.

इथपर्यंत खरंतर सर्वकाही सामान्य होतं. 2001मध्ये व्लादमीर गेसनोव याला कर्करोगाचं निदान झालं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. पण, त्याला ओळखणाऱ्या अनेकांनी त्याच्या मृत्युचं कारण कर्करोग नसून काहीतरी वेगळं आणि रहस्यमय असावं असं म्हटलं होतं. त्याचा मृत्यू कर्करोगाने झाल्याची अफवा त्याच्या शत्रूंनी पसरवली होती, असंही ते म्हणाले होते. त्यावेळी सर्वप्रथम काही स्थानिक माध्यमांनी त्याच्या या मोबाईल क्रमांकाचा उल्लेख केला होता आणि त्यामुळेच काहीतरी अघटित घडलं असावं, असं म्हटलं होतं.

त्यानंतर हा नंबर डिमेत्रोव नावाच्या एका कुख्यात ड्रग माफियाकडे आला. ते वर्ष होतं 2003. डिमेत्रोवकडे त्याकाळी कोट्यवधींची संपत्ती होती. पण, त्याच वर्षी नेमकं एका रशियन माफियाने डिमेत्रोवची हत्या केली. त्यावेळी पुन्हा एकदा हा नंबर चर्चेत आला.

त्यानंतरही हा प्रकार पुन्हा एकदा झाला. डिमेत्रोवनंतर बल्गारियाच्या डिसलिव नावाच्या व्यापाऱ्याने हा नंबर खरेदी केला. ते वर्ष होतं 2005. पण, विचित्र योगायोगाने त्याच्या काही दिवसातच त्याची देखील हत्या झाली. तेव्हा पुन्हा एकदा या फोन नंबरची चर्चा झाली.

आता मात्र, सलग तीन जणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने हा फोन नंबरच भीषण रहस्यमयी असावा अशी चर्चा रंगू लागल्या. या नंबरमुळेच या तिघांचा असा मृत्यू ओढवला, अशी वंदता पसरू लागली. अखेर हा नंबर या कंपनीने बंद करून टाकला आणि या चर्चांवर अखेर पांघरूण पडलं.

आपली प्रतिक्रिया द्या