वरळीत केमिकल लॅबमध्ये सिलिंडरचा स्फोट, महिला किरकोळ जखमी

वरळीतील सेंच्युरी इमारतीतील तिसऱया मजल्यावर असलेल्या केमिकल लॅबमध्ये आज सकाळी सिलिंडरचा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, या घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाली.

वरळीतील जुने पासपोर्ट कार्यालया शेजारील सेंच्युरी इमारत आहे. या इमारतीच्या तिसऱया मजल्यावर असलेल्या केमिकल लॅबमध्ये 250 लीटर्सच्या लिक्विड नायट्रोजन सिलिंडरचा आज सकाळी 9.30 वाजता स्फोट झाला. या स्फोटामुळे इमारतीचा काही भाग कोसळला. यात सुचित रश्मी कौर (30) ही महिला जखमी झाली. तिच्या डाव्या पायाला आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाली. त्यामुळे या महिलेने रुग्णालयात दाखल व्हायला नकार दिला. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ पोहोचून मदतकार्य केले. ‘ही व्यावसायिक इमारत असून इमारतीमधील दुर्घटनाग्रस्त भाग सील केला असून इमारतीला नोटीस बजावण्यात आली,’ अशी माहिती अग्निशमन दलप्रमुख शशिकांत काळे यांनी दिली. सुरक्षेच्या कारणास्तव इमारतीखालील रस्ता काही काळासाठी बंद करण्यात आला होता.

वरळी, प्रभादेवी आणि दादर अशा तीन भागांना एकत्र जोडणाऱया परिसरात सेंच्युरी मिलच्या मालकीची ही इमारत आहे. या परिसरात सकाळी मोठी वर्दळ असते. अशा वेळी सकाळी झाल्याने स्फोटाने या परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, काही वेळातच हा सिलिंडर्सचा स्फोट असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे स्थानिकांची जीव भांडय़ात पडला.

आपली प्रतिक्रिया द्या