बैठक व्यवस्था, रोषणाई, करीअर मॅप, सीसीटीव्ही…वरळीच्या अभ्यास गल्लीचे रूपडे पालटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरामदायक बैठक व्यवस्था, रोषणाई, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, जीवनाला दिशा देणारा करीअर मॅप, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी प्रोत्साहन देणारे भिंतींवरील आकर्षक पेंटिंग-भित्तिचित्र अशा स्वरूपात वरळीतील दोन पिढय़ांचा वारसा असलेल्या अभ्यास गल्लीचा कायापालट पालिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. शिवसेना नेत-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘अभ्यास गल्ली’चे संवर्धन-सुशोभीकरण करण्यात आले आहे.

वरळीतील पोदार रुग्णालयाजवळील एस. के. अहिरे रोडवर ही अभ्यास गल्ली आहे. या ठिकाणी विविध प्रकारची झाडेही आहेत. रहदारीपासून काहीसा दूर असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेकडो विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास, वाचन करण्यासाठी मोठय़ा संख्येने येत असतात. या ठिकाणी अभ्यास केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनीयरिंग, पोलीस अशा विविध क्षेत्रांत आपले करीअर घडवले आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणाची पडझड झाली होती. याची दखल घेत पालिकेच्या माध्यमातून या ठिकाणाची डागडुजी, सौंदर्यीकरण, सुशोभीकरण करण्यात आल्याची माहिती जी/दक्षिणचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी दिली. या कामासाठी 70 लाखांचा खर्च करण्यात आला आहे.

असे झाले काम

– विद्यार्थ्यांसाठी छत असलेली बैठक व्यवस्था
– विविध प्रकारच्या पुस्तकांची ओपन लायब्ररी, रोषणाई
– स्पर्धा परीक्षा, नोकरीच्या संधींच्या माहितीचा बोर्ड
– पिण्यासाठी स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह
– प्रेरणादायी भित्तिचित्रे, प्रोजक्टर ऍरेजमेंट
– भविष्यातील संधीची माहिती देणारा फलक