पश्चिम रेल्वेची तिकीट तपासणी मोहीम; फुकट्या प्रवाशांकडून 146 कोटींची वसुली

पश्चिम रेल्वेवरील सर्व प्रवाशांना त्रासमुक्त, आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा मिळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. मुंबई उपनगरीय लोकल सेवा, मेल/एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर ट्रेन्स आणि हॉलिडे स्पेशल ट्रेनमध्ये विनातिकीटविरहित प्रवाशांना रोखण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येते. एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली अनुभवी तिकीट तपासणी पथकाद्वारे अनेक स्थानकांवर तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. त्यात 146.04 कोटी एवकी रक्कम जमा करण्यात आली.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याची माहिती दिली आहे. जानेवारी 2023 या महिन्यात 1.70 लाख विनातिकीट प्रवासी आढळून आले. त्यात बुक न केलेल्या सामानाची प्रकरणे आढळून आली आणि त्यातून 10.46 कोटी रुपये दंड म्हणून वसूल केले. एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत विनातिकीट/अनियमित तिकीट असलेले प्रवासी आणि बुक न केलेले सामान यांची एकूण 21.83 लाख प्रकरणे आढळून आली. मागील वर्षी याच कालावधीत 13.68 लाख प्रकरणे आढळून आली होती. 59.58 टक्के प्रवाशांकडून 146.04 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जो गेल्या वर्षी याच कालावधीतील 80.07 कोटी रुपयांच्या तुलनेत 82.39 टक्क्यांनी अधिक आहे. एसी लोकल गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी वारंवार अचानक तिकीट तपासणी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचा परिणाम म्हणून एप्रिल 2022 पासून 37,800 हून अधिक अनधिकृत प्रवाशांना दंड ठोठावण्यात आला आहे.