प्रियकराला धडा शिकविण्यासाठी फेसबुकवरून बहिणींची बदनामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई  

आठ वर्षांपासून सुरू असलेले प्रेमसंबंध ब्रेकअप करून गुपचूप दुसऱया मुलीशी लग्न केल्यामुळे प्रेयसीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. याचा सूड उगवण्यासाठी प्रेयसीने प्रियकराच्या दोघी बहिणींच्या नावे फेसबुकवर चार बनावट अकाऊंट खोलून त्यांचे फोटो तसेच अन्य अश्लील फोटो, मजकूर व दोघींचे मोबाईल नंबर अपलोड केले आणि सर्वांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. अशाप्रकारे प्रियकराच्या बहिणींची नाहक बदनामी करून त्यांना त्रास देणाऱया आरती या तरुणीला क्राइम ब्रँच युनिट-८ च्या पथकाने अटक केली आहे.

युनिट-८ चे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, एपीआय विठ्ठल चौगुले, उपनिरीक्षक प्रथमेश विचारे, हिंदुराव चिंचोलकर व पथकाने तपास करून महेशच्या बहिणींच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट खोलून त्यांची बदनामी करणाऱया आरतीला अटक केली.आरतीचे महेश नावाच्या तरुणाशी गेल्या आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र त्यांचे ब्रेकअप झाले आणि मे महिन्यात महेशने दुसऱयाच तरुणीशी लग्न केले. यामुळे संतापलेल्या आरतीने महेशला धडा शिकवायचे ठरवले. त्यानुसार तिने महेशच्या बहिणींच्या नावाने चार बनावट एफबी अकाऊंट खोलले. त्यावर त्या दोघींचे मोबाईल नंबर अपलोड केले. तसेच त्यांचे फोटो, इतर अश्लील फोटो, व्हिडीओ व मजकूरदेखील अपलोड केला. त्यानंतर त्यांचे मित्र व नातेवाईकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या. कोणी अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर आपले बनावट अकाऊंट खोलून बदनामी सुरू केल्याचे समजताच महेशच्या बहिणीने विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दिली.