
उत्तर प्रदेशात नाव बदलण्याची प्रक्रिया अजूनही सुरू असून यात आता एका महामार्गाचा क्रमांक लागला आहे. उत्तर प्रदेशात अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज असं ठेवण्यात आलं असून त्यानंतर अनेक स्टेशन्स आणि जागांची नावं बदलण्यात आली आहेत.
आता या यादीत यमुना एक्सप्रेस वेचं नाव जोडलं गेलं आहे. यमुना एक्स्प्रेस वेचं नाव बदलण्यात येणार असून त्याचं नाव माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने ठेवण्यात येणार आहे. नोएडा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूमिपूजनाचा सोहळा 25 नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आला आहे. त्याच दिवशी हे नाव बदलण्यात येईल.
या विषयी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चर्चा झाली असून एका जाहीर सभेद्वारे या नाव बदलाची घोषणा करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा 2007मध्ये मायावती मुख्यमंत्री झाल्या तेव्हा या एक्सप्रेस वेचं काम सुरू झालं होतं. त्यानंतर याचं नाव यमुना एक्सप्रेस वे ठेवण्यात आलं. आता भाजप सरकारमध्ये या रस्त्याचं नाव बदलण्यात येणार आहे.
























































