यारी रोड ते लोखंडवाला 10 मिनिटांत! डिसेंबर 2027 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरी (पश्चिम) येथील यारी रोड आणि लोखंडवाला बॅक रोड जंक्शन, अमरनाथ टॉवर इमारतीजवळ महापालिकेच्या वतीने उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी हे काम डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यामुळे यारी रोड ते लोखंडवाला अंतर अवघ्या 10 मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे.

महापालिकेच्या विकास नियोजन आराखडय़ानुसार अंधेरी पश्चिम येथील कवठे खाडीच्या पूर्व आणि पश्चिम बाजूस 18.30 मीटर रुंदीचा विकास नियोजन रस्ता प्रस्तावित आहे. मात्र कवठे खाडीमुळे रस्ता विकसित करण्याच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याने या खाडीवर पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रस्तावित पुलामुळे यारी रोड, पंचमार्ग, वेसावे परिसराचा सरदार वल्लभभाई पटेल नगर लोखंडवाला संकुल आणि समर्थनगर या परिसरांशी थेट संपर्क होईल.

प्रवासाचा वेळ वाचणार

पुलामुळे वेसावे परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा वेळ मोठय़ा प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच परिसरातील वाहतूककोंडी कमी होऊन पूर्व-पश्चिम दिशेतील वाहतूक जलद होणार आहे. आगामी वेसावे-वांद्रे सागरी सेतू आणि मुंबई किनारा रस्ता प्रकल्प (उत्तर) सुरू झाल्यानंतर हा पूल पर्यायी मार्ग म्हणूनही उपलब्ध होणार आहे. सध्या या परिसरातून प्रवासासाठी सुमारे 30 मिनिटांचा कालावधी लागतो तो कमी होऊन सुमारे 10 मिनिटांपर्यंत कमी होईल. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे वेसावे, यारी रोड, लोखंडवाला आणि लगतच्या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

– पुलाची एकूण लांबी 206 मीटर असून यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल नगरच्या बाजूचा जोडमार्ग 40 मीटर, तर अमरनाथ टॉवरच्या बाजूचा जोडमार्ग 56 मीटर आहे. मुख्य पुलाची लांबी 110 मीटर असून रुंदी 11 मीटर आहे. जोडमार्ग आणि मुख्य पुलाच्या भागाची रुंदी समान ठेवण्यात आली आहे. पुलासाठी 110 मीटर लांबीचा एकेरी पल्ल्याचा पोलादी ‘बास्केट हँडल आर्च’ सांगाडा प्रस्तावित करण्यात आला आहे. या पोलादी कमानीसाठी टेन्शन रॉड्सचा वापर करण्यात येणार आहे.