5 ते 9 जानेवारीला कराडमध्ये यशवंत महोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कराड

दरवर्षी यशवंत महोत्सवाचे आयोजन यशवंत बॅक व यशवंत महिला स्वंयरोजगार प्रतिष्ठान यांच्या मार्फत अत्यंत नियोजन पध्दतीने केले जात आहे. कराडमध्ये सांस्कृतीक कार्यक्रमांचा वारसा या निमित्ताने जपण्याचे काम होत असून यशंवत महोत्सव कराड व परिसरामधील ग्रामीण भागापर्यंत दुरदुरपर्यंत पोहचलेला आहे, अशी माहिती सहकार परीषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांनी दिली.

गेली अनेक वर्षे किर्तन, प्रवचन तसेच महिला उद्योजकांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने बचत गटांची स्टॉल उभारणी करण्यात आली. गतवर्षी या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख विभागांमधील खादय संस्कृतीचा अनुभव घेण्यच्या दृष्टीने फुड फेस्टीवलचेही आयोजन करण्यात आले होते. यशवंत महोत्सव 5 जाने 2019 ते 9 जानेवारी या कालावधीमध्ये कृष्णाबाई घाट येथे रोज सायंकाळी 6.30 वा. होणार आहे.

5 जानेवारीला अभिजित पंचभाई प्रस्तुत भाई गीत गीतरामायण, 6 जानेवारीला जयंत व दिपा देशपांडे (पु.ल.देशपांडे यांचे पुतणे व सुन) प्रस्तुत ‘आठवणी भाई काकांच्या’, 7 ते 9 जानेवारीला पं. अतुलशास्त्री भगरे गुरुजी प्रस्तुत संगीतमय भागवत कथा असे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाचा सहकुटुंब व मित्रपरिवारांसह लाभ घ्यावा, असे आवाहनही शेखर चरेगावकर यांनी केले आहे.

यशवंत महोत्सव’ हा संपुर्ण कराडवासीयांचा कार्यक्रम असून कराड शहराबरोबरच सभोवतालच्या सर्व ग्रामीण भागातून भाविक या कार्यक्रमास रोज हजेरी लावतात. सर्वांच्या सहकार्याने तसेच यशवंत महिला स्वयंरोजगार प्रतिष्ठानला मिळणाऱ्या देणगीमधुन या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. अंदाजे 10 ते 15 हजार नागरीकांची उपस्थिती या कार्यक्रमास असते.