शाळेत सोडण्याच्या बहाण्याने 11 वर्षीय मुलीवर बलात्कार, नराधमाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद नायगावकर

शाळेत सोडतो असा बहाणा करून एका नराधमाने 11 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उमरखेड तालुक्यातील करोडी शेतशिवारात घडली. 10 ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे. अजीज खान अहमद खान पठाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यात धक्कादायक माहिती अशी की अजीज हा सध्या पॅरोलवर तुरुंगाबाहेर होता.

अजीज हा अत्यंत सराईत गुन्हेगार आहे.   या आधीही त्याच्यावर डझनभर हत्येचे आरोप आहेत. 10 ऑक्टोबर रोजी गावाच्या फाट्यावर वाहनाची वाट पाहत असताना एका 11 वर्षीय चिमूरडीला  शाळेत सोडून देतो  म्हणत अजीजने तिला आपल्या दुचाकीवर बसविले. उमरखेड शिवारात आल्यानंतर एका पांदण रस्त्यावर नेऊन तिच्यावर दुष्कृत्य केले. पीडित मुलीने व तिच्या कुटुंबीयांनी पोफाळी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलीस प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखून आपली तपास चक्रे तत्काळ सुरू केली.

50 ते 60 पोलीस कर्मचारी होते आरोपीच्या मागावर

आरोपीला शोधण्यात 50 ते 60 पोलीस कर्मचारी कामाला लागले होते. पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनात एलसीबी प्रमुख आधारसिंग सोळंकी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पडवी यांनी पथक स्थापन केले होते. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ यंत्रणा कामाला लावली. अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. त्यानंतर काही तासातच आरोपीला पकडण्यात यश आले. त्याच्या विरुद्ध पोफाळी पोलीस स्टेशन मध्ये कलम 363, 307, 376 ए बी, पोक्सो कायदा 4,6,8 यासह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.