
>> प्रसाद नायगावकर, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील वनविभागाच्या पांढरकवडा वनपरिक्षेत्राअंतर्गत अर्ली वर्तुळातील अर्ली नियतक्षेत्रात दीड वर्षीय वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. वनरक्षक सुरेश मुंडाले हे 11 ऑक्टोबर रोजी जंगलात गस्तसकरीत असताना दुपारी सागवान वृक्षाच्या खाली मृत वाघीण त्यांना दिसून आली. त्यांनी वरिष्ठ अधिकारी तसेच वनपरिक्षेत्र अधिकान्यांना याची माहिती दिली.
वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृत वाघिणीचे सर्व अवयव शाबूत असल्याचे दिसून आले. या वाघिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. वाघिणीचे शवविच्छेदन करण्यासाठी पशुधन विकास अधिकारी ए. पी. ओंकार यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले ही वाघीण अंदाजे दीड वर्षांची असल्याने त्यांनी सांगितले.
वाघिणीच्या मृतदेहाचे विच्छेदन करून अवयवांचे नमुने काढून सीलबंद करण्यात आले. त्यानंतर त्याच ठिकाणी वाघिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी घटनास्थळी यवतमाळ वनवृत्ताचे वनसंरक्षक व्ही. टी. घुले, विभागीय वन अधिकारी, ए. एन. दिघोळे, मानद वन्यजीव रक्षक रमजान विराणी, सहाय्यक वनसंरक्षक आर. बी. कोंडावार, वनपरिक्षेत्र अधिकारी एम.डी. सुरवसे, व वनकर्मचारी उपस्थित होते.


























































