
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
योग हा केवळ शारीरिक व्यायाम नव्हे, शरीर, मन, बुद्धी व आत्मा यांचे जीवनदर्शन आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी युनोमध्ये भाषण केल्यावर १९३ राष्ट्रांनी अनुमोदन दिले. व युनोने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर केला. आज खर्या अर्थाने जागतिकीकरणात दळणवळण क्रांती होत असून जग जवळ येत आहे. अशा वेळी विश्वाला मानवता जोडणार्या योगाचे सामर्थ्य लक्षात घेऊन त्याचा अंगिकार करावा. माणूस माणसापासून दुरावला आहे. अशा वेळी माणूस जोडणार्या योगाची गरज आहे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी केले.
पतंजली योग समितीची रत्नागिरी जिल्हा समिती, जिल्हा क्रीडा कार्यालय व जि. प. शिक्षण विभागाच्या वतीने मराठा मैदानावर चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा क्रीडाधिकारी मिलींद दीक्षित, जि. प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. बामणे, महिला पतंजली समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य सौ. रमा जोग, समितीचे जिल्हा प्रभारी अॅड. विद्यानंद जोग, भाऊ देसाई प्रमुख उपस्थित होते.
मान्यवरांनी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरवात केली. त्यानंतर सौ. पाध्ये यांनी ईशस्तवन व स्वागतगीत म्हटले. योग शिक्षक भारत सावंत यांनी रत्नागिरीवर सुरेल गीत ऐकवले. त्यानंतर विनय साने यांनी युवा स्वावलंबन शिबीर तसेच पतंजली बीएसएनएल मोबाईल कार्डची माहिती दिली. बीएसएनएलच्या भिडे मॅडम यांनी या सिमकार्ड व योजनेबाबत विस्तृत माहिती दिली. महाराष्ट्र योग प्रतिष्ठानतर्फे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत बक्षीस मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार या वेळी केला. अनंत आगाशे यांनी पतंजली समिती व स्वामी रामदेव महाराजांचे योगदान याबाबत माहिती दिली. त्यानंतर प्रोटोकॉलप्रमाणे योगासने करण्यात आली. तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय योगपटू पूर्वा किनरे व प्राप्ती किनरे या दोघी भगिनींनी र्हिदमिक योगा व जिल्हा योग प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनीही विविध आसनांची प्रात्यक्षिके दाखवली.
































































