पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मुळा धरणात बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुळा धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या नगर येथील तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मुळा धरणाजवळील चमोरी गेस्ट हाऊससमोर घडली आहे. चेतन क्षीरसागर (वय 45, रा. पाइपलाइन रोड, नगर) असे मृताचे नाव आहे.

नगरच्या पाइपलाइन रोड परिसरात रहिवासी असलेले चार मित्र रविवारी दुपारी मुळा धरण पाहण्यासाठी आले होते. धरणाजवळ जेवण केल्यानंतर चेतन क्षीरसागर हा तरुण चमोरी गेस्ट हाऊससमोरील पाण्यात पोहण्यासाठी उतरला. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चेतन बुडाला. इतर मित्रांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतीसाठी आरडाओरड केला. मुळानगर येथील आदिवासी तरुण छबू बबन पवार, विजय माळी, मुळानगर-वरवंडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अंकुश बर्डे, इंद्रजित गंगे यांनी धरणाच्या पाण्यात उतरून शोधकार्य सुरू केले. एक तासाच्या शोध मोहिमेनंतर चेतनचा मृतदेह हाती लागला.

मुळा धरणाचा पाणीसाठा 55 टक्क्यांच्या पुढे गेल्याने धरण पाहण्यासाठी जिह्यातील पर्यटकांची ये-जा सुरू झाली आहे. यापूर्वी चमोरी गेस्टहाऊस समोरील पाण्यात बुडून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पाण्यात बुडून मृत्यूच्या घटना टाळण्यासाठी धरणाच्या परिसरात सुरक्षेबाबत लक्ष ठेवण्याची अधिकारी व कर्मचाऱयांवर जबाबदारी आहे. मात्र, अधिकाऱयांचे वास्तव्य बाहेरगावी, तर कर्मचाऱयांची अपुरी संख्या असल्यामुळे धरणावरील सुरक्षेबाबत राहुरीच्या मुळा पाटबंधारे विभागाचा रामभरोसे कारभार सुरू आहे.

कृष्णवंती नदीपात्रात वाहून गेलेल्या वृद्धाचा मृतदेह सापडला

नगर: भंडारदरा धरणाजवळ कृष्णवंतीच्या पात्रात वाहून गेलेल्या नाशिक येथील वयोवृद्ध तुकाराम रामदास सांगरे (वय 70) यांचा मृतदेह रविवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात सापडला. राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शुक्रवारी रात्री कृष्णवंती नदीत गाडी कोसळली. त्या अपघातग्रस्त ठिकाणाजवळ सांगरे लघुशंकेसाठी उतरले होते. त्याठिकाणी पाय घसरल्याने ते नदीत पडले आणि वाहून गेले. शुक्रवारी रात्री आठ-साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तेव्हापासून राजूर पोलीस कर्मचारी, वन्यजीव, महसूल विभागाचे कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ त्यांचा शोध घेत होते. अखेर तिसऱया दिवशी आज रविवारी सकाळी वाकी शिवारातील नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला.