
सामना प्रतिनिधी। कुडाळ
माणगांव खो-यातील आंबेरी नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कमकुवत झाले असून वाहतूकीस धोकादायक बनले आहे. मोठ्या पावसात वारंवार पूर येऊन पूल पाण्याखाली जात असल्याने या भागातील सुमारे ३७ गावांचा संपर्क तुटतो. परिणामी शालेय मुलांसह ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होते. यामुळे या पुलाच्या नवीन बांधकामासाठी मंजुरी द्या, अन्यथा ग्रामस्थांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग युवासेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा युवासेना जिल्हा सरचिटणीस योगेश धुरी यांनी दिला आहे.
कर्ली नदीवर असलेले हे पुल ब्रिटिशकालीन असून सुमारे १५० ते २०० वर्षापूर्वीचे आहे. माणगांव खो-यातील सुमारे ३७ गावांचा संपर्क या पुलाच्या माध्यमातून होतो. प्रमुख जिल्हा मार्ग ३७ मध्ये हे पुल येत असून ते जीर्ण होऊन मोडकळीस आले आहेत. या पुलाचे अंतर जवळपास दिडशे मीटर असून सध्या हे पूल वाहतूकीस धोकादायक बनले आहे. गेल्या दिड महिन्यात या पुलावर पाच वेळा पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. या पुलावरून वाहनांची मोठी रहदारी असते.
मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पूलाच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्यात पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प होते. यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. तसेच नोकरदारवर्ग, आजारी व्यक्तींसह ग्रामस्थांचीही मोठी गैरसोय होते. त्यामुळे याबाबत संबंधित प्रशासनासह बांधकाम मंत्र्यांकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र अद्याप कोणतीही मंजुरी मिळालेली नाही. येत्या महिन्याभरात जर या पूलाच्या नवीन बांधकामासाठी मंजुरी न मिळाल्यास ग्रामस्थांच्या सहकार्याने युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा युवासेना जिल्हा सरचिटणीस योगेश धुरी यांनी दिला आहे.



























































