जन्मदाते

2
  • शिरीष कणेकर

पाच वर्षांचा मुलगा आईला म्हणतो, ‘आय लव्ह यू, मॉम.’
आई त्याला म्हणते, ‘आय लव्ह यू टू. बेटा.’
सोळा वर्षांचा मुलगा आईला म्हणतो, ‘आय लव्ह यू. मॉम.’
आई त्याला म्हणते, ‘माझ्याकडे तुला द्यायला पैसे नाहीत.’
तेवीस वर्षांचा मुलगा आईला म्हणतो, ‘आय लव्ह यू मॉम.’
आई त्याला म्हणते. ‘कोण आहे ती? कुठं राहते? काय करते?’
पस्तीस वर्षांचा मुलगा आईला म्हणतो. ‘आय लव्ह यू मॉम.’
आई त्याला म्हणते, ‘तरी मी तुला सांगितलं होतं की त्या सटवीशी लग्न करू नकोस.’
पंचावन्न वर्षांचा मुलगा आईला म्हणतो, ‘आय लव्ह यू मॉम.’
आई त्याला म्हणते, ‘हे बघ, मी कुठल्याही कागदपत्रावर सही करणार नाही.’

हा विनोद म्हणून सांगितला जातो. पण यात विनोद कुठे आहे? मला तर हे विदारक, प्रत्ययकारी सत्य वाटते. वाढत्या वयानुसार मुलाच्या ‘आय लव्ह यू, मॉम’चा गर्भित अर्थ बदलत जातो. प्रत्येक स्टेजला आई तो अर्थ अचूक ओळखते आणि उत्तर देते. मायलेकरांचं नातंदेखील काळानुरूप कसं बदलत असतं याचं हे मार्मिक उदारण आहे. ‘आय लव्ह यू’ म्हणणारा निरागस बालक पंचावन्नाव्या वर्षी तेच पुन्हा म्हणतो तेव्हा त्यात निरागस, भाबडं मातृप्रेम नसतं तर घरादाराची, शेतीवाडीची, बँकेतल्या खात्यांची, लॉकरची मालकी त्याच्या नावावर करून देणाऱ्या कागदपत्रांवर तिची सही हवी असते.

कुठून कुठे आलास रे सोन्या, असं तिचं बधीर मन आक्रंदन करत असणार. प्रत्येक केसमध्ये त्याला आईविषयी प्रेम नसेलच असं नाही, पण पैशाचं पारडं नेहमीच भारी ठरतं. प्रेम काय चाटायचंय? जगायला पैसा लागतो.

कर कागदांवर सही…
कोणीतरी म्हटलंय. – ‘पैशानं सगळं काही विकत घेता येत नाही पण जवळजवळ सगळं काही विकत घेता येतं.’
आणखी कोणीतरी म्हटलंय, ‘पैसा म्हणजे परमेश्वर नाही, पण परमेश्वरापेक्षा कुठे कमीही नाही.’
आणखी तिसऱ्या कोणीतरी म्हटलंय – ‘लिसन, माय लिटल सनी, अ रिच मॅन्स जोक इज ऑलवेज फनी.’
लग्नसमारंभात किंवा आणखी कुठे नातेवाईकांच्या भाऊगर्दीत श्रीमंत माणसानं विनोद केलाय अशी नुसती शंका जरी आली तरी माणसं खदाखदा हसतात. मी जास्त हसलो असं दाखवून देण्याची त्यांच्यात अहमहमिका लागते. अलीकडे मी काही पुचाट विनोद केला की माणसं अशीच बळेबळे हसतात. शेवटी मला त्यांना सांगायला लागतं की हसा तुम्ही पण मी श्रीमंत नाही एवढं लक्षात ठेवा. त्याबरोबर ती फटकन हसायची थांबतात. श्रीमंत नसलेल्या माणसावर हसणं वाया का घालवायचं? एकदा मी पैसेवाला नाही हे कळल्यावर माझा विनोद फालतू होता हेही त्यांना कळतं. आपल्या कधीच कामी न येणारा दुसऱ्याचा पैसा आपल्या नेत्रात व गात्रात लाचारी का आणतो?

तरुण, नवीन बायको वाट बघत्येय व म्हातारी, अंध आई काळजी करत्येय यात कोणाचं पारडं जड हे ओळखणं अवघड नाही. प्रत्यक्ष आईचं अवमूल्यन होऊ शकतं तर कोणाचंही होऊ शकतं. बापाचं तर पहिल्यांदा. याबाबतीत एक मनोहर किस्सा मला डेट्रॉइटच्या डॉ. कर्णिकांनी सांगितला होता. तो असा.

पाचव्या वर्षी मुलगा म्हणतो, ‘माय डॅडी स्ट्राँगेस्ट.’
दहाव्या वर्षी मुलगा म्हणतो, ‘माझ्या डॅडींना काय पण येतं. काहीही विचारा. ही नोज.’
सोळाव्या वर्षी मुलगा म्हणतो, ‘सगळं नाही कळत त्यांना पण काही गोष्टीतलं कळतं.’
विसाव्या वर्षी मुलगा म्हणतो, ‘हेकटपणा, दुसरं काय? दुसऱ्याचं ऐकूनच घ्यायचं नाही म्हणजे काय?’
पंचविसाव्या वर्षी मुलगा म्हणतो, ‘या माणसाशी जमवून घेणं अशक्य आहे. इतकी वर्षे जगात कशी काढली तेच कळत नाही. आई धन्य आहे.पस्तिसाव्या वर्षी मुलगा म्हणतो. ‘डॅडींचं यावर काय मत पडलं असतं कळत नाही. मला जाणून घ्यायला आवडलं असतं.’
पंचेचाळिसाव्या वर्षी मुलगा म्हणतो, ‘डॅडी, या ना परत. प्लीsssज. तुमच्या शेजारी बसायला, तुमच्याशी दोन शब्द बोलायला मी वाटेल ते करायला तयार आहे. या ना प्लीज…’’

जवळपास सगळी मुलं या चक्रातून गेलीत, जातायत. देवानं हा तडफडाट भाळी लिहून ठेवलेला असतो. त्यापासून सुटका नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जीव जाळायचा. शेवटी देह जळतोच.

 shireesh [email protected]