आयुष्यभराच्या निरपेक्ष सेवेचा गौरव! लोकशाहीर बशीर मोमीन यांच्या भावना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

आयुष्यभर तमाशात कामं केली, लोकनाट्यं सादर केली. गाणी, वगनाट्यं लिहिली. मोबदल्याची कधी अपेक्षा ठेवली नाही. अगदी पदरमोड करून कलावंतांसाठी मेळावे, आरोग्य शिबीर घेतले. या सर्व निरपेक्ष सेवेचा उतारवयात का होईना आज गौरव होतोय, खूप आनंद वाटतोय, अशा भावना लोकशाहीर बशीर मोमीन-कवठेकर यांनी व्यक्त केल्या.

तमाशा क्षेत्रातील मोलाच्या योगदानासाठी राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा ‘विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव’ पुरस्कार बशीर मोमीन यांना शाहीर मधुकर नेराळे यांच्या हस्ते रवींद्र नाट्यमंदिरात प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. माझ्या कलेला आतापर्यंत लोकाश्रय मिळाला, मात्र आज खऱ्या अर्थाने राजाश्रय मिळाला, असे मोमीन यावेळी म्हणाले. दरम्यान, लोककला संग्रहालय उभारणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.

राज्य सांस्कृतिक पुरस्कारामध्ये नाटक विभागासाठी रवी पटवर्धन, कंठसंगीतासाठी माधुरी विश्वनाथ ओक, उपशास्त्रीय संगीतासाठी श्याम देशपांडे, मराठी चित्रपटासाठी उषा नाईक, कीर्तनासाठी हभप विनोदबुवा खोंड, शाहीरीसाठी शाहीर विजय जगताप, नृत्यासाठी माणिकबाई रेंनके, आदिवासी गिरीजनासाठी वेणू बुकले, वाद्यसंगीतासाठी पं. प्रभाकर धाकडे, तमाशासाठी चंद्राबाई अण्णा आवळे, लोककलेसाठी मोहन कदम आणि कलादालनासाठी श्रीकांत धोंगडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त कलाकार अभिराम भडकमकर, योगेश शमसी, प्रकाश खांडगे आणि संध्या पुरेचा यांचादेखील विशेष सत्कार या समारंभात करण्यात आला.