
सामना ऑनलाईन, मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘चलो अयोध्या’चा नारा दिल्यानंतर भाजपची पळापळ सुरू झाली आहे. गेली चार वर्ष राम मंदिराच्या मुद्दावर मौन बाळगून असलेल्या भाजपचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी फैजाबाद जिल्ह्याचे अयोध्या असे नामांतर केले तर अयोध्येतील प्रस्तावित विमानतळास प्रभू श्रीराम आणि वैद्यकीय महाविद्यालयाला दशरथ असे नाव देण्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव कधी करणार? असा खणखणीत सवाल केला आहे.
योगी अदितयनाथ यांनी फैजाबादचे अयोध्या केले. अलाहाबादचे प्रयाग तिर्थ केले. मुख्यमंत्री देवेंद्रजी औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशीव कधी करणार?
जय हिंद
जय महाराष्ट्र
जय श्रीराम!— Sanjay Raut (@rautsanjay61) November 7, 2018
छत्रपती शिवाजी महाराजांना नामोहरम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जुलमी औरंगजेबाने खडकी या शहराचे नाव बदलून औरंगाबाद ठेवले होते, तर हैदराबादचा एक निजाम असलेल्या मीर अस्मान अली खान याच्या नावावर धाराशिवचे नाव बदलून उस्मानाबाद ठेवण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने या शहरांची नावे बदलून संभाजीनगर आणि धाराशिव केली जावी अशी मागणी केली होती. शिवसेना सातत्याने ही मागणी लावून धरत आली आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांना संपूर्ण जिल्ह्याचे नाव बदलता येत असेल तर मग या शहरांची नावे का बदलता येऊ शकत नाही असा प्रश्न शिवप्रेमींकडून विचारला जात आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे अयोध्या असे नामकरण केल्यानंतर आता गुजरात सरकारनेही कायद्याच्या अडचणी आल्या नाहीत तर अहमदाबादचे कर्णावती असे नामकरण करण्यासाठी तयार आहोत असे गुजरात सरकारने म्हटले आहेत. उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी गांधीनगर येथे वार्ताहरांशी बोलताना याबाबतची माहिती दिली. जर या दोन राज्यांमध्ये शहरांची नावे बदलली जात असतील तर मग महाराष्ट्रातील या दोन शहरांची नावे बदलण्यासाठी गेली अनेक वर्ष होत असलेली मागणी का पूर्ण होऊ शकत नाही असा प्रश्न आहे.

























































