कयाधु नदीवरचा पूल ढासळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। हिंगोली

तालुक्यातील समगा गावाकडे जाणारा कयाधु नदीवरील पूल पावसामुळे ढासळला आहे. यामुळे समगासह हिंगोली व औंढा नागनाथ तालुक्यातील १२ गावांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. दरम्यान नदीवर लवकरात लवकर नवीन पूल बांधण्यात यावा, अशी मागणी युवासेनेने केली आहे.

हिंगोली शहरासह जिल्हृयात मागील आठ दिवसापासुन सातत्याने पाऊस पडत आहे. यामुळे रस्ते व पुल खचत आहेत. समगा गावाकडे जाणाऱया रस्त्यावरील कयाधु नदीवर असलेला पूल मोडकळीस आला होता. पण त्याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभाग, जिल्हा परिषद प्रशासनाने लक्षच दिले नाही. यामुळे संततधार पावसामुळे १५ जुलै रोजी हा पूल कोसळला. यामुळे समगा, पुर, धामणी, वसई, निशाणा, येडुद, कंजारा यासह १२ गावांचा संपर्क तुटला आहे. केवळ पुलावरुन जाण्यासाठी पाऊलवाटे एवढा रस्ता शिल्लक राहिला असून दुचाकी चालक जीव धोक्यात घालुन प्रवास करत आहेत. तसेच शालेय विद्यार्थ्यांना देखील मोठय़ा अडचणीला सामोरे जावे लागत आहे. युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी दिलीप घुगे यांनी या पुलाची पाहणी करुन तातडीने दुरुस्ती करावी व पावसाळा झाल्यावर नवीन पुल उभारण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, मागील ८ दिवसापासुन जिल्हयात दाखल झालेल्या पावसाने मंगळवारी मात्र काहीवेळासाठी विश्रांती घेतली होती. दुपारी अडीच नंतर अर्धा तास शहरात पावसाच्या मध्यम सरी बरसल्या. तसेच हिंगोली जिह्यातील कळमनुरीसह अन्य ठिकाणीही पाऊस पडला.