
प्रेमविवाहानंतर दोघांनी संसार सुरू केला. मात्र, नवऱ्याला दारूचे व्यसन असल्यामुळे त्यांच्यात वादावादी सुरू झाल्या. त्यातच पत्नीने घरभाड्याचे व वीजबीलाचे पैसे साठवून ठेवले होते. मात्र पतीने गुपचूप पैसे घेउन ते दारुत उडवले. त्यामुळे पत्नी संतापली. त्यांच्यात वादावादी झाली. राग अनावर झाल्याने पत्नीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील उंड्रीतील कमल अपार्टमेंटमध्ये घडली.
अंकिता कुंदन कांबळे (वय 25 रा. उंड्री ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती कुंदन कांबळे (वय 29 रा. उंड्री ) याच्याविरूद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकिताचे वडील व्यंकट जाधव (वय 52) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंदन आणि अंकिता यांनी नोव्हेंबर 2017 मध्ये प्रेमविवाह केला होता. त्यानंतर त्यांचा संसार सुरळित सुरू होता. काही महिन्यानंतर कुंदनला दारूचे व्यसन लागले. त्यामुळे कुंदन दररोज दारू पिऊ लागला. त्यामुळे घरभाडे आणि वीजबील देण्यासाठीही त्यांची तारांबळ होत होती. त्यासाठी अंकिता पैसे साठवून कुंदनपासून दूर ठेवत होती. मात्र, 12 एप्रिलला कुंदनने अंकिताने घरभाड्यासह वीजबीलासाठी ठेवलेले पैसे गुपचूपरित्या घेतले. त्या पैशांतून दारू पिउन तो घरी आला. त्याचा राग आल्यामुळे अंकिता आणि कुंदन यांच्यात वादावादी झाली. त्यामुळे राग सहन न झाल्यामुळे अंकिताने 12 एप्रिलला स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेतले. त्यानंतर तिला उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान 24 एप्रिलला रात्री साडेबाराच्या सुमारास मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कुंदनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुंदन आणि अंकिता यांचा प्रेमविवाह झाला असून त्यांना दीड वर्षांची मुलगी आहे. 12 एप्रिलला कुंदनने घरातील पैसे चोरून त्या पैशाने तो दारू प्यायला होता. त्यामुळे त्यांच्यात वादावादी झाली. त्यातूनच अंकिताने पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान काल रात्री तिचा मृत्यू झाला आहे.
– संदीप मधाळे, सहायक पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस ठाणे






























































