नवी मुंबईत धावणार 10 इलेक्ट्रिक बसेस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | नवी मुंबई

नवी मुंबई महापालिकेला केंद्र सरकारच्या फम योजनेतून मिळणार्या 30 इलेक्ट्रिक बसेसपैकी 10 बसेस येत्या जूनपर्यंत मिळवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रदूषणाची पातळी घटवणार्या आणि वाजवी तिकीट भाडय़ात एसी प्रवास देणार्या या बसेस विषयी नवी मुंबईकरांमध्ये विशेष उत्सुकता आहे.

शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या विशेष पाठपुराव्यातून नवी मुंबई महापालिकेसाठी 30 इलेक्ट्रिक बसेसला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या बस खरेदीला परिवहन समितीच्या सभेत मंजुरी मिळाल्यानंतर प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला वर्कऑर्डर दिली आहे. त्यानुसार संबंधित ठेकेदाराने या बसेसचा पुरवठा नऊ महिन्यांमध्ये करणे अपेक्षित आहे. मात्र या 30 पैकी 10 बसेस या येत्या जून महिन्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानंतर 20 बसेस दिवाळीपर्यंत नवी मुंबईच्या रस्त्यावर धावणार आहेत.

या बसेसमध्ये वातानुकूलित यंत्र बसवण्यात येणार आहेत. बसचा प्रवास जरी थंडगार होणार असला तरी अन्य एसी बसप्रमाणे त्यांचे भाडे महागडे नसणार आहे. साधारण बसच्या तुलनेत या बसेसचे भाडे किती जास्त ठेवता येऊ शकते, यावर सध्या विचारविनिमय सुरू आहे.

अडथळ्यांचा डोंगर पार

इलेक्ट्रिक बसेसचे श्रेय शिवसेनेला मिळू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बस खरेदीच्या प्रस्तावामध्ये खोडा घातला होता. मात्र शिवसेना परिवहन समिती सदस्य विसाजी लोके, समीर बागवान, राजेंद्र आव्हाड आणि भाजपचे काशीनाथ पाटील यांनी गनिमीकाव्याने हा प्रस्ताव सभागृहात मंजूर करून घेतला. त्यानंतर सत्ताधाऱयांकडून या बसेसच्या वाटेत काही तरी विघ्न आणले जाईल, अशी शंका होती. मात्र त्यांना तसे काहीच करता आले नाही. त्यामुळे सर्व अडथळ्यांचा डोंगर आता पार झाला असून प्रशासनाने ठेकेदाराला वर्कऑर्डरही दिली आहे.