
सीएस (कंपनी सेक्रेटरी) आणि लॉ अभ्यासक्रमाची परीक्षा एकाच दिवशी आल्याने या दोन्ही परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. 20 डिसेंबरला दुपारी 2 वाजता सीएसची परीक्षा सुरू होणार आहे. याच दिवशी लॉचा शेवटचा पेपर असून परीक्षेची वेळ दीड वाजेपर्यंत आहे. दोन्ही परीक्षांमध्ये केवळ अर्ध्या तासाचे अंतर असल्याने लॉचा पेपर झाल्यावर अर्ध्या तासात सीएसच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र कसे गाठायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
मुंबई विद्यापीठाची एलएलबी (सेमिस्टर-3) ची परीक्षा 12 डिसेंबरपासून सुरू होत असून 20 डिसेंबरला सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत कंपनी लॉ विषयाची परीक्षा होणार आहे. याच दिवशी द इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात येणारी सीएस परीक्षा सुरू होणार असून जुना आणि नवीन अभ्यासक्रमाची परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. लॉच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे हजारो विद्यार्थी सीएसची परीक्षाही देतात. त्यामुळे दोन्ही परीक्षांचा अभ्यास करण्याबरोबरच 20 डिसेंबरला परीक्षेची वेळ कशी गाठायची या चिंतेत विद्यार्थी आहेत.
सीएसच्या जुन्या अभ्यासक्रमाची शेवटची परीक्षा
सीएसच्या जुन्या अभ्यासक्रमाची ही शेवटची परीक्षा आहे. त्यामुळे सीएसच्या जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देण्याबरोबरच लॉच्या परीक्षेलाही बसलेल्या विद्यार्थ्यांना सीएसची परीक्षा ही शेवटची संधी आहे. पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना सीएसच्या नव्या अभ्यासक्रमाचीच परीक्षा द्यावी लागेल, असे स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितले. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांची कसरत टाळण्यासाठी लॉ परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी सचिन पवार यांनी केली आहे.
लॉ परीक्षेच्या वेळात बदल करण्यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी असल्या तरी परीक्षांच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. विनोद पाटील, संचालक, परीक्षा मूल्यमापन मंडळ, मुंबई विद्यापीठ

























































