आषाढीसाठी 12 लाख बुंदीचे लाडू, 1 लाख राजगिरा लाडू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पंढरपूर

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने आषाढी यात्रेस येणाऱया भाविकांची संख्या लक्षात घेऊन बुंदी लाडूचा प्रसाद विक्री करण्यासाठी 12 लाख बुंदी लाडू तयार करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार दि. 3 जुलैपासून सुमारे 70 महिला व पुरुष कर्मचाऱयांमार्फत तीन पाळ्यांमध्ये बुंदी लाडू तयार करण्यात येत आहेत. दररोज 90 हजार लाडू तयार करण्यात येत आहेत. आतापर्यंत सुमारे 5 लाख लाडू तयार करून विक्रीकरिता पाठवण्यात आले आहेत.

एक बुंदी लाडू 70 ग्रॅम वजनाचा असून एका पॉकेटमध्ये दोन बुंदी लाडू पॅक करण्यात येत आहेत. 12 लाख बुंदी लाडू तयार करण्यासाठी 30 टन हरभरा डाळ, साखर 35 टन, शेंगदाना रिफाइंड तेल 40 टन, बेदाना 1 टन, वेलदोडे 1 टन असे साहित्य वापरण्यात येत आहे. लाडू तयार करताना कामगारांकडून स्वच्छतेचे काटेकारपणे पालन करण्यात येत असून अन्न व औषध प्रशासन वेळोवेळी भेट देऊन तपासणी करत असल्याने सुवर्णक्रांती महिला उद्योग सेवा सह.संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. एकादशी दिवशी भाविकांचा उपवास असल्याने फराळासाठी मंदीर समितीकडून लाडू विक्री केंद्रावर 1 लाख राजगिरा लाडू विक्री करण्यात येणार आहेत.

चार ठिकाणी विक्री केंद्रे
आषाढी यात्रेत मंदिराच्या पश्चिमद्वार, उत्तरद्वार, पूर्वद्वार येथे बुंदी लाडू विक्री करण्यात येत आहेत. तर भाविकांच्या मागणीखातर 65 एकर येथेही लाडू विक्री केंद्र उभारण्यात येणार आहे.