संभाजीनगरातही मृत्यूचे तांडव, घाटी रुग्णालयात 24 तासांत 18 रुग्णांचा करुण अंत

महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांवर सध्या यमदूतांची पडछाया आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात सोमवारी चोवीस तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाला. त्या घटनेला चोवीस तास उलटत नाहीत तोच आज छत्रपती संभाजीनगरात मृत्यूने तांडव घातले. तेथील शासकीय रुग्णालयात 18 रुग्णांचा उपचारांअभावी करुण अंत झाला. दोन कोवळय़ा बालकांनीही तडफडून प्राण सोडले. दरम्यान, नांदेडच्या रुग्णालयात आज आणखी चार बालकांसह 11 दगावल्याने मृतांचा आकडा 35 वर पोहोचला. मिंधे सरकारच्या हलगर्जीने या निष्पाप जिवांचे बळी घेतले.

नांदेडच्या शासकीय रुग्णालयानंतर आज छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय घाटी रुग्णालयात चोवीस तासांत 18 रुग्ण दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. पुरेसे उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे हे मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालय प्रशासनाने मात्र या रुग्णांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत माहिती दिलेली नाही. हे रुग्ण गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाल्याचे कारण सांगत प्रशासनाने हात वर केले आहेत.

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांपासून अनेक इंजेक्शने व औषधांचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. त्यात टॅक्सिम, पॅन्टॉप, रॅन्टॅक, अॅन्टी डी, एएसव्ही ही इंजेक्शने आणि सेप्ट्रॉन, सायफेन, आयव्ही मेट्रोजिल, ओमेझ, एझी, मल्टी व्हिटॅमिन एमव्हीबीसी, फॉलिक ऑसिड, सिफ्लॉक्स या गोळ्यांचा समावेश आहे.

औषधांबरोबरच प्रसूतीसाठी तसेच नवजात बाळांना लागणारे साहित्य तिथे उपलब्ध नाही. बाहेरून औषधे आणल्याशिवाय रुग्णांवर उपचार केले जात नाहीत. गर्भवतींच्या आवश्यक चाचण्याही बाहेरून कराव्या लागतात. साध्या रक्त तपासण्यांसाठीही खासगी लॅबमध्ये पाठवले जाते. घाटी रुग्णालयातही पुढील 15 दिवस पुरेल इतकाच औषध साठा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे.

सरकारी मेडिकल कॉलेजांमध्ये कंत्राटी भरतीचा घाट

ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यूंचाही गैरफायदा घेण्याचा मिंधे सरकारचा प्रयत्न सुरू आहे. या घटनांचे कारण सांगत राज्याच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा घाट सरकारने घातला आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांमध्ये क आणि ड वर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. एका खासगी पंपनीमार्फत ही पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

कायम औषधांची वानवा

‘गतिमान सरकार’ अशी बिरुदावली मिरवणाऱया मिंधे सरकारच्या कासवछाप धोरणामुळेच घाटीत गेल्या वर्षभरापासून औषधांचा तुटवडा आहे. सेवाभावी संस्था, दानशुरांच्या मदतीवर औषधांची तात्पुरती व्यवस्था होते आणि सरकारच्या चालूगिरीवर पांघरुण पडते. याचा फटका रुग्णांना बसत आहे.

‘हाफकिन’चे 25 कोटी थकले

घाटीला लागणारी औषधी आणि यंत्रसामग्री व उपकरणे पुरविण्याचे पंत्राट हाफकीन पंपनीकडे आहे. वर्षभरात हाफकिनकडून 30 कोटींची खरेदी करण्यात आली. मात्र त्यापैकी केवळ पाच कोटी रुपये देण्यात आले. उरलेल्या रकमेसाठी हाफकिनने औषध पुरवठा थांबवला. त्यामुळे रुग्णांना पदरमोड करून बाहेरून औषधी खरेदी करावी लागते.

चौदा रुग्णांचा बळी सरकारमुळेच

घाटी रुग्णालयात झालेल्या 14 रुग्णांच्या मृत्यूस मिंधे सरकारच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. आज त्यांनी घाटी रुग्णालयाला भेट देऊन अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांना यासंदर्भात जाब विचारला. सुपरस्पेशालिटी विभागाच्या खासगीकरणाचा घाट घातल्यास शिवसेना आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

अजून किती बळी घेणार?

सरकारी रुग्णालयात रुग्णांचे रोजच्या रोज बळी जात आहेत, सरकार अजून किती बळी घेणार, असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ठाणे, नांदेड, संभाजीनगरच्या रुग्णालयांमध्ये औषधांची खरेदीच झालेली नाही. ऑर्डर देऊनही औषधे मिळत नाहीत. आपला दवाखाना, इतर दवाखाना अशा योजना सरकार राबवते; पण असे जीव जात असतील तर त्याचा काय उपयोग, असेही दानवे यांनी म्हटले आहे.

या सरकारी हत्या; 302 अंतर्गत खुनाचे गुन्हे दाखल करा

कळवा येथील सरकारी रुग्णालयानंतर नांदेड, छत्रपती संभाजीनगरमधील सरकारी रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव झाले. या सरकारी हत्या असून दोषींवर कलम 302 अंतर्गत खुनाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. सरकारकडे जाहिरातबाजी करण्यासाठी आणि आमदार खरेदीसाठी पैसे आहेत; मग सर्वसामान्य जनतेच्या औषधे खरेदीसाठी पैसे नाहीत का, असा संतप्त सवालही नाना पटोले यांनी केला. राज्याच्या आरोग्य यंत्रणेला भस्म्या रोग झाला असून संपूर्ण यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे, अशी टीका त्यांनी केली.