तुम्हाला जातीयवादी भाषण देणारे पंतप्रधान म्हणून लक्षात ठेवतील; मल्लिकार्जुन खरगे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर डागली तोफ

तुम्ही एनडीएच्या सर्व उमेदवारांना भाषणात नेमके काय बोलायचे हे पत्राद्वारे सांगितले, परंतु तुमच्या पत्राच्या सुरावरून तुम्ही अतिशय हताश आणि चिंताग्रस्त असल्याचे दिसते. पंतप्रधानपदाला न शोभणारी भाषा तुम्ही भाषणात वापरता. त्यामुळे निवडणुकीनंतर लोक तुम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी जातीयवादी भाषण देणारे पंतप्रधान म्हणून लक्षात ठेवतील, अशा परखड शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून टीका करणाऱया मोदी यांना खरगे यांनी पुन्हा एकदा पत्राद्वारे चर्चेचे आव्हान दिले आहे. मोदींना लिहिलेल्या तीनपानी पत्रात खरगे यांनी मोदी यांना जणू आरसा दाखवल्याची चर्चा आता सर्वत्र आहे.

निवडणूक जिंकण्यासाठी जातीयवादी, द्वेषपूर्ण भाषणे करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या भाषणातून गेल्या दहा वर्षांत काय कामे केली हे सांगावे आणि त्यावर मते मागावी, असा सल्लाही खरगे यांनी मोदी यांना दिला आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात काय लिहिले आहे आणि काय आश्वासने दिली ते स्वतः वाचू आणि समजू शकतात इतके मतदार हुशार आहेत. आमची गॅरंटी इतकी सोपी आणि स्पष्ट आहे की, आम्हाला त्याचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, आमचा जाहीरनामा न्यायाबद्दल बोलतो. समाजातील सर्व घटकांपर्यंत विकास कसा पोहोचवणार हे जाहीरनाम्यात नमूद केले असून दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यांवर चर्चा करण्याचे आव्हान खरगे यांनी मोदी यांना दिले आहे.

पत्रातून खरगे यांनी मांडले हे मुद्दे

– काँग्रेस तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचे तुम्ही आणि गृहमंत्री शहा म्हणता, पण गेल्या 10 वर्षांत तुम्ही आणि तुमच्या मंत्र्यांनी चिनी लोकांचे तुष्टीकरण केलेले आम्ही पाहिले आहे. आजही तुम्ही चीनला घुसखोर म्हणायला नकार देता, याकडे खरगे यांनी मोदींचे लक्ष वेधले आहे. 19 जून 2020 रोजी गलवान खोऱयात शहीद झालेल्या 20 हिंदुस्थानी जवानांच्या बलिदानाचा तुम्ही चिनी सैनिकांनी घुसखोरी केली नाही असे सांगून अपमान केला आहे, असेही खरगे यांनी म्हटले आहे.

– अरुणाचल प्रदेश, लडाख आणि उत्तराखंडमध्ये चीनकडून वारंवार उल्लंघन होत आहे. एलएसीजवळ लष्करी पायाभूत सुविधांच्या बांधकामामुळे तणाव वाढत आहे. असे असूनही गेल्या पाच वर्षांत हिंदुस्थानातील चिनी वस्तूंच्या आयातीत 54.76 टक्क्यांची वाढ झाली असून 2023-24 मध्ये ही आयात 101 अब्ज डॉलर पार गेल्याचे उघड झाले आहे, ही बाबही खरगे यांनी पत्रातून मोदी सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे.

– एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण काढून  मुस्लिमांना दिले जाईल असा तुमचा दावा आहे, पण आमची व्होट बँक प्रत्येक हिंदुस्थानी आहे. प्रत्येक गरीब, मागास, महिला, तरुण, कामगार, दलित आणि आदिवासी हे आमचे मतदार आहेत. आरएसएस आणि भाजपाने 1947 पासून प्रत्येक टप्प्यात आरक्षणाला विरोध केला, हे सर्वांना माहीत आहे. आरक्षण संपवण्यासाठीच त्यांना राज्यघटना बदलायची असल्याचे तुमच्या नेत्यांनी उघडपणे सांगितल्याचे खरगे यांनी पत्रात नमूद केले आहे.

– लोकांचे कष्टाचे पैसे काढून घेतले जातील असे तुम्ही म्हणता. तुमच्या पक्षाने देणग्या, द्या आणि घ्या, करार आणि लाच, खंडणी, बनावट कंपन्या आणि योजनांचा वापर करून निवडणूक रोख्यांद्वारे तब्बल 8,250 कोटी रुपये गोळा केले. यापैकी तुम्ही दलित कुटुंबांना किमान 10 कोटी रुपये परत करू शकता?  असा सवालही खरगे यांनी पत्रातून केला आहे.