
नगर जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणी चार जणांना अटक केल्यानंतर त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अ. के. मांडवगडे यांनी त्याना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर आतापर्यंत 10 ते 12 जणांचे जबाब घेण्यात आले आहेत. राज्य शासनाने नेमलेल्या कमिटीचे सदस्य गुरुवारी नगरमध्ये येणार आहेत.
नगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्यात काल सायंकाळी चार जणांना अटक करण्यात आली. आरोपींमध्ये एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिका यांचा समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक करण्यात आली होती.
त्या आरोपींना बुधवारी येथील न्यायालयामध्ये हजर केले असता, सहाय्यक सरकारी वकील अमित यादव यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, या घटनेमध्ये 11 जणांचा जीव गेला आहे. अन्य सात जण वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत आहेत, असे सांगितले. पोलीस विभागाने परिस्थितीची पाहणी केल्यानंतर तपासामध्ये अनेक बाबी उघड झाल्या आहेत. या चार जणांना अटक करण्यात आली आहे, यांनी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मदत केली नाही, हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. ते घटनास्थळी होते व त्यांनी मदत केली असती तर यामध्ये काही जणांचे प्राण यामध्ये वाचण्यास मदत झाली असती. मात्र ते बाहेर पळून गेले असे दिसून येत आहे. या ठिकाणी ज्या रुग्णांचे नातेवाईक आहे, त्यांनी त्या ठिकाणी आपले रुग्ण बाहेर काढण्यासाठी किंवा इतरांना मदत करण्यासाठी ते पुढे सरसावले होते. असेही त्यामध्ये दिसून येत आहे. हे कर्मचारी तिथे ड्युटीवर कार्यरत असताना त्यांची जबाबदारी रुग्ण वाचवण्याची होती. मग ते त्या ठिकाणाहून पळून का गेले, हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे, असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयामध्ये यावेळी केला.
आरोपींमध्ये वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे यांची ड्युटी असताना त्या गैरहजर राहिल्या आहेत, ही बाब सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच अन्य तीन काही कर्मचारी आहेत. त्यांनी आम्ही ड्युटीवर नव्हतो, आमच्या ड्युट्या वेगवेगळ्या वेळी होत्या, असे नमूद केले. ही बाब सुद्धा योग्य नाही. परस्पर त्यांना आपल्या वेळा बदलता येत नाही. त्यांनी मस्टर मध्येही फेरफार केला. आयसीयूमध्ये ते उपस्थित नव्हते. त्यामुळे एकंदरीत सर्व बाबी लपवण्याचा प्रयत्न करीत आहेत, ही बाब समोर आली आहे. रुग्णालयामध्ये जावेळी आग लागली, त्या वेळेला डॉक्टर त्याठिकाणी नव्हते, हे सुद्धा दिसून आले आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी यासंदर्भात स्वतःहून तक्रार दिली आहे व तक्रारदारांमध्ये त्यांनी जी काही घटना समोर दिसते, त्याचा सर्व उल्लेख या तक्रारीमध्ये त्यांनी केला आहे. त्यांनी सीसीटीव्ही डीव्हीआर सुद्धा ताब्यात घेतले आहे. त्यानुसार तपास सुरू केला आहे. काही जणांचे जवाबसुद्धा आम्ही घेत आहोत. या प्रकरणांमध्ये गांभीर्य असल्यामुळे 304 अ हे कलम लावले होते आता हे कलम ठेवून 304 कलम लावण्यात आलेले आहे. तसेच जे 17 रुग्ण या ठिकाणी उपचार घेत होते, त्यातील 11 जणांचा या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी कार्यरत असलेल्या जो काही स्टाफ आहे त्यांनी कुठल्या प्रकारचे प्रयत्न केले नाही, हे दिसून येते. यातील कोणालाही यामध्ये इजा झालेली नाही किंवा कोणीही जखमी झालेले नाही. त्यामुळे हे कर्मचारी नेमके कुठे व कसे होते, याचा आम्हाला आता शोध घ्यायचा आहे, असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयामध्ये केला. ही बाब अतिशय गंभीर आहे. या प्रकरणांमध्ये अन्य काही तपास पोलिसांना करायचा आहे. तसेच इमारत बांधल्यानंतर त्यामध्ये सर्व सुविधा होत्या की नव्हत्या, तसेच या ठिकाणी जे काही लाईटचे कनेक्शन देण्यात आले होते, ते योग्य पद्धतीने देण्यात आले होते की नाही, यासह 20 ते 22 कारणे न्यायालयासमोर यावेळी मांडण्यात आली. अन्य काही जणांचा आम्हाला शोध घ्यायचा आहे, तसेच परस्पर रित्या जर यांनी ड्युटी बदललेले आहे, असे सांगतात, तर नेमकी जबाबदारी कोणाची आहे, त्याचा सुद्धा आम्हाला शोध घ्यायचा आहे. त्यामुळे या आरोपींना पोलीस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद न्यायालयामध्ये केला.
दुसरीकडे आरोपीचे वकील महेश चौगुले यांनी घडलेली घटना पाहता, जे काही आरोपींची नावे पोलिसांनी घेतली आहे, ती चुकीची घेतली आहेत. वास्तविक पाहता यांचा काहीही संबंध नव्हता. जी तक्रार दिली आहे त्याप्रमाणे 304 अ कलम लागू शकत नाही, यासह विविध मुद्दे त्यांनी युक्तीवादात मांडले. त्यांनी मांडलेले मुद्दे सरकारी वकील यांनी खोडून काढत कलम 304 कलम का लावले जाते, हे सांगत घटना घडल्यानंतर जे कोणी उपस्थित होते, त्यांची जबाबदारी त्यांनी टाळली आहे. जबाबदारी टाळणे हा सुद्धा एक प्रकारचा गुन्हा आहे, अशा घटनेच्या काळामध्ये पळून जाणे कितपत योग्य आहे, त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला आहे, म्हणून आता त्यांच्यावर 304 कलमांतर्गत कारवाई करावी, म्हणून आम्ही ते कलम आता वाढविले असल्याचे त्यांनी युक्तिवादात म्हटले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर वरील चारही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान यातील शिंदे आणि पठारे यांना निलंबित करण्यात आले आहे. तर शेख आणि आनंत यांचा सेवा समाप्ती करण्याचा राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचा आदेश आहे. जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संघटनांनी परिचारिकांना या गुन्ह्यात अटक केल्यामुळे निषेध नोंदवला असून ही कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप केला आहे. यामधील प्रमुख सूत्रधाराला अटक करण्याची मागणी केली आहे.
























































