नळांच्या मीटरसाठीचे 20 कोटी रुपये उजनी-सोलापूर समांतर पाइपलाइनसाठी देणार, सोलापूर महापालिकेचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

नळांना मीटर बसवण्याचे काम थांबवून त्यासाठीचा राखीव 20 कोटी रुपयांचा निधी उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीसाठी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ‘स्मार्ट सिटी’ कंपनीच्या वतीने शहरात प्रायोगिक स्तरावर 24 तास पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. संबंधित परिसरातील नळधारकांना पाणी बिल आकारणीसाठी नळांना मीटर बसवण्याचे काम सुरू झाले होते. परंतु, ते काम तूर्तास थांबवण्याचे महापालिकेने ठरवले आहे. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याचा प्रायोगिक प्रकल्प म्हणून स्मार्ट सिटी भागात नळांना मीटर बसकण्यात येत आहेत. काही ठिकाणी घराबाहेर मीटर लावल्यावरून वाद झाले आहेत. चाटी गल्ली परिसरामध्ये आतापर्यंत एकूण 1600 नळांना मीटर बसवले. आता तूर्त नव्याने मीटर खरेदी थांबवून सुमारे 20 कोटी रुपये समांतर जलवाहिनीसाठी कर्ग करण्यात येणार आहेत. शहरात स्काडा प्रणालीसाठी ‘स्मार्ट सिटी’ कंपनीने 84 कोटींचा मक्ता दिलेला आहे.

लक्ष्मी-विष्णू मिल आवारातील अतिक्रमण हटवणार

लक्ष्मी विष्णू मिल आवारातील सुमारे 15 एकर जागा नियमानुसार महापालिकेला सार्वजनिक सुविधांसाठी मिळालेली आहे. या जागेवर सध्या पालिकेचा ताबा आहे. तेथे विविध प्रदर्शने, मनोरंजन आदी उपक्रमांसाठी सुविधा देण्यात येणार आहेत. हे काम ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत करण्यात येत आहे. येथील अर्धा एकर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. ते काढण्यासाठी मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी अतिक्रमण प्रतिबंधक विभागास आदेश दिला आहे. सभागृहाने सुमारे अर्धा एकर जागा एका संस्थेस देण्याचा ठराव पालिकेत केला होता. तो ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.