
मुंबईत गेले काही दिवस गोवर पूर्ण आटोक्यात आल्याने दिलासा मिळाला असतानाच आज गोवरच्या विसाव्या मृत्यूची नोंद झाली. साकीनाका येथील 8 महिन्यांचे बाळ आज दगावले. त्यामुळे गोवर नियंत्रणात असला तरी नागरिकांनी आपल्या बाळाची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सोमवारी मृत्यू झालेल्या मुलीला ताप, खोकला, सर्दी होती आणि 8 महिन्यांची मुलगी असल्याने रुबेला लसीसाठी पात्र नव्हती, असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
























































