26/11 च्या आठवणी आजही अस्वस्थ करतात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिषेक भटपल्लीवार। चंद्रपूर

26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुंबईच नाही, तर संपूर्ण देशाच्या इतिहासातील काळा दिवस ठरला. या हल्ल्यामुळे दहशतवादाची खरी ‘दहशत’ मुंबईसोबत संपूर्ण जगानंही अनुभवली. या हल्ल्यात 50 हून अधिक निरपराध नागरिकांनी आपले प्राण गमावले. तर दहशतवाद्यांशी दोन हात करताना मुंबई पोलीस दलातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी शहीद झाले. याच हल्ल्यात बॉम्ब शोधक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील धुळे यांनीही अभूतपूर्व कामगिरी बजावली होती. पण आजही 26/11 च्या आठवणी त्यांना अस्वस्थ करतात.

सध्या धुळे हे चंद्रपूर पोलीस दलात कार्यरत असून सावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक या पदावर आहेत. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या तत्वावर चालत स्वप्नील धुळे यांनी चंद्रपूर पोलीस दलात काम करीत असताना अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीतेने पार पडल्या आहेत. पण आजही 26/11च्या आठवणी त्यांना अस्वस्थ करतात.

26 नोव्हेंबरला रात्री 8.30 नंतर प्रत्यक्ष हल्ल्याला सुरुवात झाली. दोन दहशतवादी कुलाब्यातील ‘लिओपोल्ड कॅफे’ रेस्टारंटमध्ये घुसले आणि त्यांनी अंदाधुंद फायरिंग करण्यास सुरुवात केली. सीएसएमटी स्थानकावर अतिरेक्यांनी फायरिंग सुरु केली त्यात 50 च्या वर नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला. त्याचवेळी दहशतवाद्यांनी सीएसएमटी स्थानक परिसरात बॉम्ब व हॅन्ड ग्रेनेडस आणि आरडीएक्स ठेवले होते, याबाबत चेंबूर पोलीस स्टेशनला कॉल आला .त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील धुळे तात्काळ आपल्या चमूसह सीएसएमटीकडे निघाले, तेथे पोहचताच बॉम्ब शोधक पथकाला जे दृश्य समोर दिसले ते कल्पनेच्या पलिकडचे होते.

चारही बाजूला रक्तामांसाचा सडा पडला होता. सगळीकडे मृतदेह पडले होते. , गोळीबार सुरु होता, गोळी नेमकी कोणत्या दिशेने येत आहे हे कळत नव्हते. पण जीवाची पर्वा न करता धुळे व त्यांचा चमू बॉम्बच्या शोधात समोरच्या दिशेने निघाले. मृतदेह आणि समोर मृत्यू असं दृश्य बॉम्ब शोधक पथकासमोर होत, पण न घाबरता बॉम्ब शोधक पथकाने आपले कार्य सुरूच ठेवले व तब्ब्ल 3 जिवंत एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस , 16 जिवंत हॅन्ड ग्रेनेड्स निकामी केले. धुळे व त्यांच्या चमुने दाखवलेल्या या अभूतर्पूर्व कामगिरीमुळे हजारो नागरिकांचे प्राण वाचले.