घातपाताच्या तीन घटनांनी कोल्हापूर हादरले, दोन महिलांचा खून, तिसरीचा मृतदेह आढळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहर आणि लगतच्या परिसरात घातपाताच्या तीन घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. करवीरमध्ये पतीने पत्नीचा खून केला असून, जयंती नाल्यातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. तर, कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाघबीळ घाटातही एका महिलेचा खून करण्यात आला आहे.

करवीर तालुक्यातील दोनवडे येथे कौटुंबिक वादातून पतीने दोरीच्या साहाय्याने गळा आवळून पत्नीचा खून केल्याची घटना आज पहाटे घडली. अश्विनी एकनाथ पाटील (वय 28) असे या विवाहितेचे नाव आहे. तसेच दुपारी चारच्या सुमारास शहरातील जयंती नाल्यात जलशुद्धीकरण केंद्राजवळ एका 35 वयोगटातील महिलेचा मृतदेह आढळला. संबंधित महिलेने आत्महत्या केली की, तिचा घातपात झाला याबाबत अद्यापि माहिती स्पष्ट झालेली नाही.

दरम्यान, कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वाघबीळ घाटात एका महिलेच्या निर्घृण हत्येचा प्रकारही समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी करवीर, पन्हाळा, कोडोली पोलीस दाखल झाले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित खून केल्याचे सांगत आहे.

दरम्यान, घटनास्थळी मृतदेह आढळून आढळला नसला, तरी रक्ताचे डाग असलेली चादर आढळली आहे. तसेच रस्त्याच्या कडेला रक्ताचे डाग आढळले आहेत. नेमका खून झाला आहे की नाही, याबाबत अद्यापि स्पष्टता झाली नसली, तरी तपास सुरू असल्याचे पोलिसांकडुन सांगण्यात आले आहे.