12 शेतकऱ्यांचा 30 एकर ऊस जाळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

वीजवाहक तारा तुटून लागलेल्या आगीत बारा शेतकऱ्यांचा तीस एकर वरील ऊस जळून खाक होण्याची घटना तालुक्यातील वडगाव येथे घडली. आग लागल्या नंतर ती वीजवायला पाणीच उपलब्ध नसल्याने या शेतकऱ्यांवर हतबल होण्याची वेळ आली तर सकाळी दहा च्या सुमारास हि घटना होऊनही सायंकाळी उशिरा पर्यंत एकाही शासकीय अधिकारी व वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली नव्हती.

या बाबत आधी माहिती अशी कि पाथर्डी पासून ३० कि मी अंतरावर असलेल्या वडगाव येथे आज सकाळी दहाच्या सुमारास वीजवाहक तारा अचानक तुटून त्या उसावर पडल्याने उसाने अचानक पेट घेतला. जळालेला सर्व ऊस हा तोडणीसाठी आलेला असल्याने वाळून गेलेला होता. या आगी मधे एकनाथ बडे, अमीन शेख, बाबुलाल शेख, महंमद शेख, आश्रुबाई पांगरे, बबन पांगरे, भास्कर पांगरे, घनशाम पांगरे, भाऊसाहेब पांगरे, रावसाहेब पांगरे, आश्रू पांगरे, विष्णू पांगरे या शेतकऱ्यांचा तोडणी साठी आलेला ऊस जळून खाक झाला. आज सकाळी हि आग लागल्याचे लक्षात येताच वडगाव येथील शे दीडशे तरुण घटनास्थळी जमा झाले. हि आग विझवण्यासाठी पाणीच नसल्याने सरपंच आजिनाथ बडे, शाहदेव पांगरे, दत्तात्रय गरड, युवराज पांगरे, आजिनाथ पांगरे, गणेश बडे व इतर तरुणांनी शक्य होईल तेवढा ऊस तोडून बाजूला टाकला. हा ऊस तोडत असताना शाहदेव पांगरे यांच्या कमरेला असलेल्या टॉवेल ने पेट घेतला होता मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही.

या घटनेची माहिती ग्रामस्थांनी प्रशासन व वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना दिली मात्र सायंकाळ पर्यंत कोणीही घटनास्थळी फिरकले नाही. वडगाव येथे १९८५ साली वीजवाहक तारा बसवण्यात आल्या होत्या त्या अत्यंत जीर्ण झाल्या असूनही अद्याप पर्यंत त्या बदलण्यात आलेल्या नाहीत.  एक महिन्यापूर्वीही वीजवाहक तार तुटून एका शेतकऱ्याचा एक एकर ऊस जळून खाक झाला होता. तातडीने वीजवाहक तारा बदलाव्यात तसेच जळालेला ऊस वृद्धेश्वर कारखान्याने घेऊन जावा अशी मागणी आजिनाथ बडे यांनी केली आहे. या संदर्भात शहादेव पांगरे यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली.