
केंद्रीय माहिती आयोगापुढे 28 नोव्हेंबर 2019 पर्यंत 33,487 तक्रारी आणि अपील प्रलंबित आहेत, अशी लेखी माहिती केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी लोकसभेत दिली. देशातील नागरिक तसेच परदेशात राहणार्या मूळ हिंदुस्थानींना माहिती अधिकारातून अर्ज ऑनलाइन करता यावा यासाठी सरकारने वेब पोर्टलही सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदुस्थानी नागरिक www.rtionline.gov.in या वेब पोर्टलवरून अर्ज करू शकतात. माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी आकारले जाणारे शुल्कही ऑनलाइन भरता येईल. हे शुल्क स्टेट बँक ऑफ इंडिया वा तिच्याशी संलग्न बँका तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून भरता येऊ शकते. ही सुविधा सध्याच्या घडीला केंद्र सरकारच्या 2271 सार्वजनिक विभागांसाठी उपलब्ध आहे, असेही राज्यमंत्री सिंह यांनी या वेळी स्पष्ट केले.
राज्यांना ‘एनआयसी’चा तांत्रिक मदतीचा हात
राज्य सरकार आपापल्या पातळीवर वेब पोर्टल खुले करू शकतात जेणेकरून त्या त्या राज्यांतील नागरिक राज्य सरकारच्या वेब पोर्टलचा आधार घेऊन माहिती अधिकारातून ऑनलाइन अर्ज करू शकतील. वेब पोर्टलसाठी इच्छुक असलेल्या राज्यांना आवश्यक ती तांत्रिक मदत पुरवण्याबाबत केंद्र सरकारने राष्ट्रीय माहिती केंद्राला (एनआयसी) निर्देश दिले आहेत.




























































