
‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’ अशा गगनभेदी ललकारीने आज सह्याद्रीचे कडेकपारे अक्षरशः दुमदुमून गेले. 353 व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळा हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर मोठय़ा दिमाखात पार पडला. हे ‘रामराज्य’ याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून आलेल्या लाखो मावळ्यांनी राजदरबारात हजेरी लावत महाराजांना मानाचा मुजरा केला. डौलाने फडकणारे भगवे ध्वज, सनई-चौघडय़ांचे टिपेला पोहोचलेले सूर, तलवारींचा खणखणाट अन् दांडपट्टे घेऊन सुरू असलेले मर्दानी खेळ यामुळे दुर्गराज रायगडावर जणू शिवकालच अवतरला होता.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने आज किल्ले रायगडावर भव्यदिव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले होते. सकाळी 7 वाजता नगारखान्यात युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राजसदरेवर पहाडी आवाजात शाहीरांची ललकारी घुमली. राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी येताच लाखो मावळ्यांनी महाराजांचा जयजयकार करत संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. शिवाजी महाराजांच्या राजसदरेवरील सिंहासनारूढ मूर्तीवर सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात आला. यावेळी रायगड पोलीस दलाच्या वतीने शासकीय मानवंदना देण्यात आली.
रायगडाच्या संवर्धनासाठी वारंवार दिल्ली गाठावी लागते – संभाजीराजे
किल्ले रायगडावर संवर्धनाचे काम सुरू आहे. मात्र रायगड प्राधिकरणाला अपेक्षित असलेली स्वायत्तता न दिली गेल्याने विविध कामांसाठी वारंवार मंत्रालय तसेच दिल्लीत जावे लागते, अशी खंत रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष व युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. राजसदरेची पुनर्बांधणी करण्याचा आपला मनोदय असून पावसाळ्यानंतर नगारखान्यावरील छत बांधणीचे काम सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली.




















































