
आधीच महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्यांना आणखी एक जोरदार झटका बसणार आहे. पेट्रोल–डिझेलच्या दरांना पुन्हा एकदा ‘आग’ लागण्याची शक्यता असून, वाहनधारकांचे बजेट कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तब्बल 8 टक्क्यांची वाढ केल्यानंतरही तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल–डिझेलच्या किमती वाढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जूनच्या अखेरपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आणखी पाच रुपयांची वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारी तेल कंपन्यांच्या दाव्यानुसार, त्यांना दररोज 610 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत जवळपास 5 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. आयसीआरए लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि समूह सहसंस्थापक प्रशांत वशिष्ठ यांच्या माहितीनुसार 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एकूण जवळपास 7.5 रुपये प्रति लिटरची दरवाढ करण्यात आली होती. या दरवाढीनंतरही सरकारी तेल कंपन्यांना पेट्रोलवर जवळपास 5.5 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवर 4.5 रुपये प्रति लिटरचे नुकसान होत आहे. इंधन तोटाच नाही तर आयसीआरएच्या अंदाजानुसार, एलपीजीवर जवळपास 680 रुपये प्रति सिलिंडरचा तोटा सहन करावा लागत आहे, तर एव्हिएशन टर्बाइन फ्युएलवरील नुकसान जवळपास 93 कोटी रुपये प्रतिदिन इतके झाले आहे. कच्चा तेलाच्या आयातीचा वाढलेला खर्च आणि इराण-अमेरिकेतील वाढता तणाव यामुळे जागतिक बाजारात इंधनाच्या किमती भडकल्या आहेत. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांचा नफा आणि तोटय़ाचे गणित बिघडले आहे. वाढलेला भार कंपन्या ग्राहकांवर टाकण्याच्या तयारीत आहे.
स्वस्तातले ‘फ्लेक्स फ्युअल’ आले
केंद्र सरकारने पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉलमिश्रित इंधन फ्लेक्स फ्युअलला प्रोत्साहन देण्यासाठी नवी दिल्लीतील पुसा रोड येथे देशातील पहिले ई 85 फ्युअल स्टेशन सुरू केले आहे. फ्लेक्स फ्युअल इंधनात 85 टक्के एवढे इथेनॉल तर 15 टक्के पेट्रोल आहे. या इंधनाची किंमत 82.12 रुपये प्रति लिटर एवढी ठेवली आहे. हे सध्याच्या ई20 पेट्रोलपेक्षा साधारणपणे 20 रुपयांनी स्वस्त आहे. सरकार आणि तेल कंपन्या सुरुवातील 50 ते 100 स्टेशन उभारणार आहे. काही ऑटो कंपन्यांनी इथेनॉलमिश्रित कार आणि बाईक लाँच करायला सुरुवात केली आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत 500 आणि 2027 च्या अखेरपर्यंत 5 हजार स्टेशन सुरू करण्याचे लक्ष्य आहे.
पाकिस्तानात पेट्रोल–डिझेल चार रुपयांनी स्वस्त
कराची ः जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण व्हायला सुरुवात होताच पाकिस्तानने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चार रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलचे दर 381.78 रुपये प्रति लिटरवरून 377.79 रुपये प्रति लिटर झाले आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्यानंतर पाकिस्तानने चार रुपयांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात चार रुपयांनी कपात केली. हिंदुस्थानात मात्र अद्याप पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली नाही.
तेल विकून अमेरिकी कंपन्या मालामाल
इराण युद्ध आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील संकटाने संपूर्ण जग वेठीस धरले गेले, परंतु या संकटात अमेरिकेच्या तेल आणि ऊर्जा कंपन्यांनी प्रचंड पैसा कमावला असून त्या मालामाल झाल्या आहेत. तेलाच्या वाढलेल्या किमती आणि पुरवठय़ाच्या संकटामुळे अमेरिकन कंपन्यांना स्पर्धात्मक फायदा मिळाला आहे, असा दावा रशियाची सरकारी तेल कंपनी रोसनेफ्टचे प्रमुख इगोर सेचिन यांनी केला आहे. अमेरिका स्वतःच्या स्वार्थासाठी इराणविरोधात राजकारण करत असून जागतिक ऊर्जा बाजारपेठेला वेठीस धरत आहे. अमेरिकेने इराणविरोधात केलेल्या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगावर झाले आहे. या युद्धातील सामरिक धोक्याचे योग्य मूल्यांकन केले गेले नाही. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसला, असेही त्यांनी म्हटले आहे.
Menj hesš^esue ef[Pesue
मुंबई 111.18 रुपये 97.83 रुपये
ठाणे 111.38 रुपये 99.07 रुपये
पुणे 112.04 रुपये 98.68 रुपये
नागपूर 111.80 रुपये 98.48 रुपये
नाशिक 112.44 रुपये 99.07 रुपये
कोल्हापूर 112.57 रुपये 99.23 रुपये
अमरावती 112.89 रुपये 99.54 रुपये


























































