घराचे वैभव असलेल्या वृद्धांना सांभाळा…मराठवाड्यात कोरोनामुळे सात दिवसांत 393 वृद्धांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>महेश कुलकर्णी

सुरकुतलेला चेहरा, कमरेला आलेला बाक, लुकलुकती नजर… म्हातारी माणसे म्हणजे घराचे वैभव. पण या वैभवाला कोरोनाची काळी नजर लागली आहे. मराठवाड्यात सात दिवसांत कोरोनाने 393 घरांचे हे वैभव हिरावून नेले. 1 एप्रिल ते 7 एप्रिल या कालावधीत साठीच्या पुढील वयोगटात मृत्यूचा दर 70 टक्के असल्याचे दिसून आले आहे. आपल्या घराचे हे ऐश्वर्य जपण्यासाठी मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा़, वृद्धांना वाचवण्याचा हाच उपाय आहे.

लक्षणे कोरोनाची, उपचार मात्र घरातच
ज्यांना मधुमेह, अस्थमा, रक्तदाब, कर्करोग, क्षयरोग यासारखे आजार असतात त्यांना कोरोनाचा लवकर संसर्ग होतो. वृद्धांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त असते. सुरुवातीला सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसतात. म्हणून घरीच गोळ्या औषधे दिली जातात. त्यात चार ते पाच दिवस जातात. तोपर्यंत संसर्ग फुफ्फुसांपर्यंत पोहोचलेला असतो. मग धावपळ सुरू होते. पण हाती काही लागत नाही. कारण संसर्ग हा आटोक्याबाहेर गेलेला असतो.

वृद्धत्वाभोवती कोरोनाचा विषारी पाश
एक एप्रिल ते सात एप्रिल या सात दिवसांच्या कालावधीत मृत्यूची जी आकडेवारी आली आहे, ती धक्कादायक आहे. या काळात मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यात मिळून एकूण 590 मृत्यू झाले. त्यापैकी तब्बल 393 मृत्यू हे साठ वर्षांवरील वृद्धांचे आहेत. हे प्रमाण साधारण 70 टक्के एवढे आहे.

साठीच्या पुढील वयोगटात कोरोनाची प्रचंड दहशत
कोरोनाचा महाप्रचंड उद्रेक झालेल्या दहा शहरांपैकी संभाजीनगर व नांदेड हे मराठवाड्यातील दोन जिल्हे आहेत. या दोन्ही जिल्ह्यांच्या गल्लीबोळात कोरोनाने हातपाय पसरलेत. महिन्याच्या बाळापासून नव्वदी पार केलेल्या आजोबांपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यासोबतच उर्वरित मराठवाड्यातही घराघरांत बाधित रुग्ण आढळत आहेत. फेब्रुवारीत आलेल्या या दुसऱ्या लाटेने कौटुंबिक व्यवस्थाच बिघडवून टाकली आहे. या लाटेचा सर्वात जास्त परिणाम घरातील वृद्धांवर झाला आहे.

थोडीशी लक्षणे दिसली तरी उशीर करू नका
घरातील वृद्धांमध्ये कोरोनाची थोडीशी लक्षणे दिसली तरी लगेच डॉक्टरांशी संपर्क करा. उशीर करू नका. दुखणे अंगावर काढून मग डॉक्टरांकडे येण्यात अर्थ नाही. कोरोनाचा नवा स्ट्रेन अतिशय घातक आहे. लवकर निदान झाल्यास पुढचे उपचार सुकर होतात. कोरोनाची नियमावली पाळणे हाच सध्याचा रामबाण उपाय आहे.
-डॉ. शैलजा राव, जेरियाट्रिक विभाग, घाटी

धास्ती घेऊ नका, लढा द्या…
आयुष्याच्या संध्याछायेत वावरणाऱ्या वृद्धांनी कोरोनाची प्रचंड धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे. याच पिढीने आपल्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंगांना तोंड दिले आहे. शून्यातून विश्व उभे केले आहे. घराचे हे वैभव जपण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यामुळे सर्वात अगोदर वृद्धांशी संवाद वाढवावा. त्यांना उमेद द्यावी. कोरोना ही समस्या नसून तो आजार आहे हे पटवून द्यावे. मुख्य म्हणजे त्यांना वेळ द्यावा. म्हणजे या दहशतीतून बाहेर पडण्यास त्यांना मदत होईल.
– डॉ. संदीप शिसोदे, मानसोपचार तज्ज्ञ

1 एप्रिल ते 7 एप्रिलपर्यंतचे मृत्यू

जिल्हा                  एकूण मृत्यू                 साठ वर्षांवरील मृत्यू
संभाजीनगर               203                           135
जालना                     49                               23
परभणी                     52                               40
नांदेड                      171                             117
हिंगोली                       24                                7
बीड                        42                                 32
लातूर                        29                                26
धाराशिव                     21                              13
एकूण                       590                            393