
सामना ऑनलाईन, मुंबई
आयकर विभागाच्या पथकाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला मंगळवारी मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतलं. या आमदाराकडे ४० लाख रुपयांची बेहिशोबी रोकड सापडली असून ती आयकर विभागाने जप्त केली आहे. या पैशांचा स्त्रोत सांगू न शकल्याने ही रक्कम जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या आमदाराचा जबाब नोंदवल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले आहे. मात्र या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आल्याने या आमदाराला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संदीप बाजोरिया असं या आमदाराचे नाव असून ते विधानपरिषदेचे सदस्य आहे. बाजोरिया हे नागपूरहून मुंबईला येत होते. नागपूरला सीआयएसफच्या जवानांना त्यांच्या बँगेमध्ये मोठ्या प्रमाणावर नोटा ठासून भरल्याचं दिसलं होतं. मात्र नोटांमुळे कोणताही धोका नसल्याने आणि कारवाई करण्याचे सीआयएसएफला अधिकार नसल्याने जवानांनी बाजोरिया यांना जाऊ दिले होते. मात्र सीआयएसएफने याबाबत मुंबईतील विमानतळावरील अधिकाऱ्यांना आणि आयकर विभागाला कल्पना दिली होती की बाजोरिया यांच्याकडे कमीतकमी २५ लाख रूपये आहेत. या सूचनेच्या आधारावर बाजोरिया यांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्याकडील रोकड जप्त करण्यात आली. चौकशीनंतर बाजोरिया यांना जाऊ देण्यात आले.
टाईम्स ऑफ इंडीयाशी बोलताना बाजोरिया यांनी सांगितलं की त्यांच्याकडे सापडलेली रक्कम ही वैध असून ते वरळीतील एका घराच्या व्यवहारासाठी चालले होते. या व्यवहारासाठी आपण ही रक्कम काढली होती आणि ही रक्कम बँकेतून काढल्याचे आपल्याकडे पुरावे आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. आपल्याकडे असलेले सगळे पुरावे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. मेसर्स बाजोरिया कन्स्ट्रक्शनच्या आर्थिक उलाढालींची आयकर विभाग तपासणी करीत आहे. त्याच्याशी या रकमेचा काही ताळमेळ बसतोय का हे आयकर विभागाचे अधिकारी तपासत आहेत.
महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्यामध्ये संदीप बाजोरिया यांचंही नाव असून त्यांच्याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेला आहे. अमरावती विभागातील एका धरणाचं कंत्राट मे.बाजोरिया कन्स्ट्रक्शनला मिळालं होतं. या कंपनीने कामात अनियमितता केल्याचा आरोप आहे. याबाबत बोलताना बाजोरिया यांनी सांगितलं की ते विधानपरिषदेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी या कंपनीतील पदाचा राजीनामा दिला होता.
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत बोलताना सांगितलं की बाजोरिया यांनी त्यांच्याकडे सापडलेल्या पैशांबाबत दिलेलं स्पष्टीकरण हे न पटणारं आहे. या संपतीचा स्त्रोत हा संशयास्पद असल्यानं ही रोकड जप्त केली असून या प्रकरणी पुढील चौकशी केली जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे. जर चौकशीमध्ये बाजोरिया दोषी आढळले तर त्यांच्याकडून या बेहिशोबी संपत्तीवर कर आकारला जाईल, याशिवाय त्यांच्याकडून दंडही वसूल केला जाईल.


























































