भाजप आमदार राहुल कुल यांच्या साखर कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा; सीबीआयकडे तक्रार दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांच्या मागे ईडी व सीबीआय चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. अशातच भाजप आमदार राहुल कुल अध्यक्ष असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सीबीआयकडे तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी भाजप आमदार अध्यक्ष असलेल्या पुणे जिह्यातील दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात झालेल्या 500 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस आणले आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी एका पत्राद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तपशीलवार माहिती सादर करत या घोटाळय़ाची निःपक्ष चौकशी करण्याची मागणी केली होती, मात्र त्यानंतरही राज्य सरकार किंवा संबंधित तपास यंत्रणांकडून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे संजय राऊत यांनी थेट भीमा पाटस साखर कारखान्यातील गैरव्यवहाराची सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे.

प्रकरण काय?

भीमा सहकारी साखर कारखान्याने ऊस तोडणी वाहतुकीच्या कारणासाठी एकाच वेळी एकाच कारणासाठी एकापेक्षा अधिक बँकांचे कर्ज काढून 210 कोटी 25 लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला.

 अध्यक्ष राहुल कुल व कारखान्याचे सभासद मंडळ तसेच लेखापरीक्षक यांनी त्यांच्या वैयक्तिक आर्थिक लाभापोटी सन 2016-17, सन 2019-20, सन 2020-21 आणि 2021-22 या वर्षात कारखाना गळीत हंगाम बंद असताना अनामत येणे रकमेच्या माध्यमातून 128 कोटी 14 लाख  रुपये आणि खुल्या साखर साठय़ाची परस्पर विक्री करून 32 कोटी 11 लाख असा एकूण 160 कोटी 25 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार केला.

याशिवाय सन 2014-15 आणि 2015-16 मध्ये तत्कालीन संचालक मंडळाने ऊस तोडणी वाहतुकीच्या कारणासाठी एकापेक्षा अधिक बँकांचे कर्ज काढून फसवणूक केली. यामध्ये अंदाजे 50 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा करून संचालक मंडळाने बँकांची फसवणूक केली आहे.

आर्थिक गैरव्यवहाराकडे फडणवीसांचे दुर्लक्ष

भीमा  सहकारी साखर कारखान्यातील 500 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात ही तक्रार मी केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी माझ्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता मी सीबीआयचे दरवाजे ठोठावले आहेत. बघुयात पुढे काय होतेय, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.