
>> पराग पोतदार
‘असावा एखादा छंद’ हा सध्याचा ट्रेडिंग हॅशटॅग. अल्पावधीत लोकप्रिय या हॅशटॅगद्वारे आपण अनेक रील्स पाहिले असतील. असाच आगळा छंद जडलेले सुधीर भावे, ज्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी नवीन कल्पनांना आकार देत 11 प्रकारच्या सायकली तयार केल्या आहेत.
एका मुलाकडे अभ्यासासाठी भरपूर पुस्तके असतात, तर वय हा केवळ एक आकडा असतो आणि शिकण्याची जिज्ञासा कायम असेल तर नवनिर्मितीला मर्यादा नसतात, हे गुजरातच्या वडोदरा येथील निवृत्त मेकॅनिकल अभियंता सुधीर भावे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
वयाच्या 86व्या वर्षीही नवीन कल्पनांना आकार देणाऱ्या या जिद्दी अभियंत्याने आतापर्यंत तब्बल 11 प्रकारच्या वैशिष्टय़पूर्ण सायकली तयार केल्या आहेत. 2012 मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांनी परदेशात पाहिलेल्या महागडया सायकलींमधून प्रेरणा घेऊन स्वतःच्या कल्पकतेने भारतात स्वस्त आणि अनोख्या अशा 11 प्रकारच्या सायकली बनवल्या आहेत
2012 मध्ये अभियांत्रिकी क्षेत्रातील कारकीर्द संपल्यानंतर त्यांच्या मनात एक विचार सतत घोळत होता तो म्हणजे आता पुकोणत्या नव्या गोष्टीचा शोध घ्यायचा? या प्रश्नाचे उत्तर त्यांना 2016 मध्ये अमेरिकेतील एका भेटीदरम्यान मिळाले. ते मोठ्या मुलीकडे गेले असताना त्यांनी काही विलक्षण सायकली पाहिल्या. काही सायकलींना आसनच नव्हते आणि त्या उभं राहून चालवाव्या लागत होत्या, तर काहींची रचना पारंपरिक सायकलींपेक्षा पूर्णपणे वेगळी होती.
या सायकलींच्या रूपांनी ते भारावून गेले. जेव्हा त्यांना कळले की, या सायकलींची किंमत सुमारे 1400 डॉलर आहे, तेव्हा त्यांच्या मनात एक नवा विचार आला की, अशा सायकली भारतात स्वतः का तयार करू नयेत?
भारतात परतल्यानंतर त्यांनी आपल्या मित्राच्या कार्यशाळेत प्रयोग सुरू केले. काही महिन्यांच्या मेहनतीनंतर केवळ 300 डॉलरच्या खर्चात त्यांनी पहिली इलिप्टिकल सायकल तयार केली. अशा प्रकारे अमेरिकेत ज्या सायकलींची किंमत सुमारे 1400 डॉलर्स होती, ती त्यांनी स्वदेशी साहित्याचा वापर करून भारतात अवघ्या 25,000 रुपयांत तयार केली.
लवकरच वडोदऱ्यात त्यांच्या सायकलींची चर्चा होऊ लागली. लोकांच्या उत्सुकतेचे रूपांतर मागणीत झाले आणि त्यांना विविध ठिकाणांहून ऑर्डर्स मिळू लागल्या. याविषयी सुधीर भावे सांगतात, नाशिक, नागपूर आणि अहमदाबादमधील अनेक अस्थिरोगतज्ञांनी माझ्याकडून या सायकली तयार करून घेतल्या आहेत. त्यांच्या मते, या सायकली शरीरासाठी उत्तम ऑर्थोपेडिक व्यायाम ठरतात.
त्यांचा प्रवास इथेच थांबला नाही. त्यानंतर त्यांनी टांडेम बायसिकल, सिंगल व्हील सायकल, फोल्डेबल व्हील सायकल, हॅन्डपॉवर सायकल आणि हाफ व्हील सायकल यांसारखी अनेक आगळीवेगळी मॉडेल्स विकसित केली. अलीकडेच त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन एक विशेष सायकलही तयार केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी बनविलेल्या या सायकलींचा वापर ते स्वतः आजही नियमितपणे करतात.
या सायकलींची वैशिष्टय़े म्हणजे त्यांनी अशा प्रकारच्या सायकली तयार केल्या आहेत, ज्या चालवताना सायकलिंगसोबतच उत्तम फुल बॉडी वर्कआऊट मिळतो. त्यांनी एक अशी इलेक्ट्रिक सायकल बनवली आहे, ज्याची बॅटरी संपल्यास ती सामान्य सायकलीसारखी पॅडल मारूनही चालवता येते. ते स्वतः रोज 10 किलोमीटर सायकलिंग किंवा पायी चालणे करतात
त्यांच्या कल्पकतेची आणि ऊर्जेची दखल प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी घेतली आहे. त्यांनी सुधीर भावे यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना त्यांच्या प्रयोगांसाठी महिंद्रा कंपनीची फॅक्टरी वापरण्याची खुली ऑफर दिली होती.

























































