
सामना ऑनलाईन । कोलकाता
कोलकातामधील ठाकुरपुकूर भागात एका प्ले स्कूलमध्ये दोन वर्षाच्या मुलाचा लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मुलाचा लैंगिक छळ केल्याने त्याच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे पालकांना त्याच्यावर अत्याचार झाल्याचे समजले. याप्रकरणी पालकांनी ठाकुरपुकूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
West Bengal: 2-year-old allegedly sexually abused at a play school in Kolkata, police register case under POSCO Act
— ANI (@ANI) July 5, 2018
सोमवारी सदर मुलगा नेहमी प्रमाणे शाळेत गेला होता. त्या दिवशी शाळेत डॉक्टर्स डेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतून घरी आल्यानंतर मुलाची आई त्याचे कपडे बदलत होती त्यावेळी त्यांना मुलाच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव होत असल्याचे आढळून आले. त्यांनी तात्काळ मुलाला डॉक्टरकडे नेले असता मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. त्यानंतर मुलाच्या आईने त्याच्याकडे याबाबत विचारणा केली असता शाळेतील डॉक्टरांनी त्याच्या गुप्तांगाला हात लावल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पालक मुलाला घेऊन कोलकाता नॅशनल रुग्णालायत घेऊन गेले तेथे काही तपासण्या केल्या असता मुलाच्या गुप्तांगाला अंतर्गत दुखापत झाल्याचे देखील समजले. तसेच मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचे देखील सांगण्यात आले.
या प्रकरणाची मुलाच्या पालकांनी शाळेकडे तक्रार केली. मात्र शाळेच्या मुख्यध्यापकांनी असे प्रकार शाळेत घडणे शक्य नसल्याचा दावा करत पालकांना सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे मुलाच्या पालकांनी याप्रकरणी ठाकुरपुकूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
























































