
अमित घोडेकर
हे वर्ष व्हॉईस म्हणजेच आवाजावर चालणाऱया तंत्रज्ञानाचे वर्ष असेल. आपल्या मोबाईल फोनमध्येही आवाजावर चालणारी अनेक ऍप्स येणार आहेत.
2018 मध्ये तंत्रज्ञानाने खूप धमाल उडवून दिली. अनेक असाध्य गोष्टी गेल्या वर्षातील बदललेल्या तंत्रज्ञानामुळे मुठीत आल्या. पण 2019 मध्ये त्याहून मोठय़ा गोष्टी आपल्यासमोर येणार आहेत. तंत्रज्ञानाच्या या झेपेमुळे 2019 हे वर्ष मैलाचा दगड ठरेल हे नक्की. नव्या वर्षात रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लार्ंनग, रोबोटिक्स, आणि मोठया प्रमाणात डेटा (माहितीचा) वापर करून अनेक गोष्टी आपल्यापुढे येतील. यातील काही गोष्टी आपल्यापुढे 2018 मध्येही आल्या होत्या, पण या वर्षी त्यांचे खूप मोठे रूप आपल्यासमोर येणार आहे.
गेल्या वर्षी आपण सोफिया नावाच्या रोबॉटने काय धमाल केली हे बघितलेच आहे. या वर्षी आपल्यासमोर सोफियासारखे अनेक रोबॉट आलेले दिसतील. हे रोबोट्स आणखी वेगवेगळ्या प्रकारची कामे करतील. अगदी घरातील स्वयंपाक करून द्यायचं कामही करतील. या वर्षी घरात वापरता येतील असे अनेक रोबोट्स प्रायोगिक तत्वावर अनेक ठिकाणी आणले जाणार आहेत. हे रोबोट्स अगदी घरातील फरशी पुसण्यापासून ते अगदी तुमच्या आईच्या किंवा बायकोच्या हाताची चव असलेले जेवणदेखील बनवतील आणि हे खरंच शक्य आहे.
ड्रोन, ड्रायव्हरलेस कार्स आणि इंडस्ट्रीयल रोबॉटबरोबरच या वर्षी संगणकातही रोबोट्स वापराचे काम मोठया प्रमाणात होणार आहे. हे रोबोट्स संगणकात राहून माणसाऐवजी स्वतःच माणसाची कामे करेल. म्हणजेच तुम्ही संगणकाला काही तोंडी आदेश दिला तर संगणक लगेच ते काम करेल. पुढच्या वर्षी तोंडी सूचनांचे पालन करणारे अनेक गॅझेट्स आपल्यासमोर येणार आहेत. हेही एक प्रकारचे मिनी रोबोट्सच म्हणता येतील.
हे वर्ष व्हॉईस म्हणजचे आवाजावर चालणाया तंत्रज्ञानाचे वर्ष असेल. आपल्या मोबाईल फोनमध्येही आवाजावर चालणारी अनेक ऍप्स येणार आहेत. म्हणजेच कोणतीही ऍप्स फक्त आवाजावर चालवता येतील. त्यासाठी काहीही टाईप करायची गरज पडणार नाही. उदा. जर तुम्हाला मुंबई ते दिल्ली असा विमानप्रवास करायचा असेल तर तुम्ही फक्त वेळ किंवा दिवस आवाजाने सांगितले की मोबाईल स्वतःच तिकीट काढून तुमच्यासमोर ठेवेल. याचे अजून एक उदाहरण म्हणजे तुम्हाला कुणाचा फोन येत असेल आणि तुम्हाला काही माहिती देवून कॉल बंद करायचा असेल तर तुम्ही टाईप केलेली माहिती तुमच्याच आवाजात समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली जाईल. एकंदरीत 2019 हे वर्ष ‘आवाज की दुनिया’च असणार आहे.
























































