भयानक..! राजधानीत थरार, 45 सेकंदात 50 वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. किरकोळ वादावरून भरदिवसा एका घरमालकाने भाडेकरू व त्याच्या पत्नी आणि मुलावर 45 सेकंदात 50 वेळा धारदार चाकूने वार केले. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी आरोपी भाडेकरुंवर चाकूहल्ला करत होता. त्यावेळी अनेकजण तेथे उपस्थित होते. पण त्यांची मदत करण्याऐवजी काहीजण त्यांच्यावरील हल्ल्याचा व्हिडीओ काढण्यात मग्न होते. दरम्यान आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याचे नाव आजाद आहे. तर वीरु असे भाडेकरुचे नाव आहे.

येथील डीडीए जनका येथे आजादचे घर असून वीरु पत्नी सुनीता, मुलगा आकाश व लहान मुलगी बबलीबरोबर तेथे भाड्याने राहत होता. वीरू वेळेवर भाडे देत नसल्याने आजाद बरोबर त्याचा वरचेवर वाद व्हायचा. त्यातच काही दिवसांपूर्वी वीरुची मुलगी घराच्या गच्चीवर खेळत असताना गंमत म्हणून तिने जवळच्या बाटलीतून खाली पाणी फेकले. ते नेमके खाली उभ्या असलेल्या आजादच्या अंगावर पडले. त्यावरून वीरु व आजाद यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. हे भांडण इतके विकोपास गेले की माथेफिरू आजादने जवळचा चाकूने वीरुवर सपासप वार करण्यास सुरूवात केली. यावेळी पतीच्या मदतीसाठी धावून आलेल्या सुनीतावरही आजादने वार केले व त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या आकाशलाही जखमी केले. याप्रकाराने हादरलेल्या वीरूने लोकांकडे मदतीची याचना केली पण कोणीही पुढे आले नाही. वीरू लोकांच्या हातापाया पडत होता तर आजाद त्याच्यावर सपासपा वार करत होता. अखेर त्याने वीरुच्या पोटात वार करत त्याचे पोटच फाडले. यामुळे वीरुचे आतडीच बाहेर आली. रक्तबंबाळ वीरु, सुनीता आणि आकाश रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आजादने तिथून पळ काढला. यादरम्यान लोक मात्र वीरुची मदत न करता त्याच्यावरील हल्ल्याचे व्हिडीओ काढत होते.

नंतर पोलिसांनी त्या तिघांना रुग्णालयात दाखल केले असता वीरुला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर उपचारादरम्यान सुनीताचाही मृत्यू झाला असून आकाशची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान पोलिसांनी व्हिडीओ बघितल्यानंतर काही तासातच आजादला अटक केली.