
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
‘हिंदुस्तान एका आगळयावेगळया संकटातून जात आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान सिमेवर तणाव वाढत असून पाकड्यांनी अतिरेक्यांच्या माध्यमातून पुलवामाची घटना घडवून आणली. हा प्रॉक्सीवार असून सर्जिकल स्ट्राईक होत असताना आपल्या देशातील काही विघातक शक्ती देशात अशांतता माजविण्याचे काम करीत आहे. अशा शक्तीपासून आपण सावध असले पाहिजे. परंतु काही राजकारणी सिमेचे रक्षण करणा-या सैनिकांबद्दल साशंकता घेतात, हे मोठे दुदैव आहे. असे लोक देशाचे नागरिक म्हणून घेण्यास लायक नाहीत’, असे प्रतिपादन पद्मश्री विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस कोपरगावच्या भुमी कन्या श्रीमती निलीमाताई पवार यांना कोपरगाव भुषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होते यावेळी ते बोलत होते.

अॅड. निकम पुढे म्हणाले, आज समाज सोशल मीडिया तसेच विविध वाहिन्यावरील मालिका सर्रासपणे पाहिल्या जातात. त्या कितपत वेळेपर्यंत पाहाव्या याचे भान सर्वांनी ठेवावे. इतिहास हा सर्वांना कळायला हवा, आमची नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या कुटुंबीयांच्या ज्ञानात आवश्यक भर पडली पाहिजे. त्यासाठी आपले आईवडीलच मोठे विद्यापीठ आहे. हिंदुस्थान हा संस्कृतीप्रधान देश आहे. येथे सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदांने राहतात. हेच काहींना पाहवत नाही. त्यार विघातक शक्ती या देशात सामाजिक अशांतता पसरवितात. देशाला या घडीला युध्द परवडणारे नाही. या देशात आपले सैनीक शत्रुला चारीमुंडया चित करून विजय मिळवतो तेंव्हा त्याच्या कैफ व उन्माद आपल्या डोक्यात गेला नाही पाहिजे, असे ते म्हणाले.






























































