
<< प्र. ह. दलाल
विद्यापीठ शिक्षण आयोगासह आजपर्यंत नेमलेल्या जवळ जवळ सर्वच शिक्षण आयोगांनीही शिक्षणाचे माध्यम मातृभाषेलाच म्हटले आहे. भाषा म्हणून इंग्रजीवर आपण जरूर प्रभुत्व मिळवूया, पण सर्वांसाठी प्रथमपासून इंग्रजी माध्यमाचा स्वीकार मुळीच नको. यासाठी राष्ट्रहित लक्षात घेऊन राजकारण विरहीत कृती हवी. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की, देश भूगोलाने तयार होतो तर राष्ट्र हे भाषेतूनच साकारते. भाषा नष्ट झाली की संस्कृतीही नष्ट होते. जगातली अनेक उदाहरणे याला साक्षी आहेत. तेव्हा राष्ट्रपेमी नागरिकांनो, आता तरी जागे व्हा. तुझे आहे तुजपाशी हे लक्षात घेऊन भावी पिढ्याची ससेहोलपट थांबवूया.
जर्मनी, जपान, फ्रान्स, रशिया, चीन यासह युरोपमधीलही अनेक देशांत त्यांच्या मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाते. इंग्रजीतून नाही. तरीही त्या देशांची सर्वच क्षेत्रांत प्रचंड प्रगती झालेली आहेच ना? मध्यंतरी कोरियातील एका उच्चपदस्थ हिंदुस्थानी तंत्रज्ञाचे पत्र वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोरियातील सर्व कामकाज कोरियन भाषेतच चालते. त्यांचे सहकारी तंत्रज्ञ अत्यंत हुशार आहेत पण आपल्याकडील पाचवीतल्या विद्यार्थ्यांइतकेही इंग्रजी त्याला येत नाही, पण त्यामुळे त्या देशाची प्रगती थांबली का? आपण मात्र उगाचच इंग्रजीला कवटाळून धरल्याने बहुसंख्य लोकांना व मुलांनाही शिक्षणापासून व पर्यायाने सर्वांगीण विकासापासून दूर ठेवत आहोत. याबाबत जपानचे उदाहरण कौतुकास्पद आहे. त्यांनी पाश्चात्त्य ज्ञान, विज्ञानाचा, वाङ्मयाचा कसून अभ्यास केला. ते ज्ञान स्वभाषेत आणले. त्यासाठी अनेक नवीन शब्दही घडविले; पण शिक्षणाचे माध्यम मातृभाषाच ठेवले. त्यामुळे नवी पिढी अधिक सक्षम घडली. जपानने विज्ञानात पाच नोबेल पारितोषिके मिळविली अन् आपण? आपण आपले शब्द क्लिष्ट आहेत अशी टिंगलटवाळी करतो व त्यापेक्षाही अधिक क्लिष्ट इंग्रजी शब्दांचा भडिमार निरागस बालकावर करून त्यांची बौद्धिक वाढच थोपवून ठेवतो आणि वरून त्याचाच वृथा अभिमानही बाळगतो! ज्ञान ही बाहेरून आत ओतण्याची वस्तू नसून ती आतून बाहेर अभिव्यक्त होणारी एक शक्ती आहे. आपल्या विचार, भावना परकीय भाषेत प्रभावीपणे विद्यार्थी प्रकट करू शकत नाही व भावना नीट व्यक्त करता आल्या नाहीत तर अशा व्यक्ती शीघ्रकोपी होतात. एकसंध पद्धतीने विचार न करू शकणारे आत्मविश्वास घालवून बसतात व अपयशाचे धनी होतात.
मराठीचे श्रेष्ठत्व
अवहेलना आणि विरोधाला न जुमानता सुमारे 700 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी मराठीचिये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करून दिला. ‘ज्ञानेश्वरी’सारख्या जगन्मान्य अपूर्व ग्रंथ रचला. तो काळ तर मराठीच्या बाल्यावस्थेचा होता. अविकसित अवस्थेत तिच्या अंगी एवढं सामर्थ्य होतं तर आज प्रौढावस्थेत ती किती सक्षम असायला हवी, खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा या तीन दिग्गजांनी तिला ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळवून दिला. ‘‘परि एक एक शब्द तू नवा जो शिकसी। शक्ती तयाची उलथील जगासी।’’ असं केशवसुत म्हणतात त्याप्रमाणे मराठीच्या शब्दाशब्दांत प्रचंड सामर्थ्य वास करीत आहे. हा आत्मविश्वास मनामनांत निर्माण व्हायला हवा. अनेक विद्वानांनी संगणकासाठीही मराठी सक्षम असल्याचे म्हटले आहे. ‘युनिकोड’ या फॉन्टमुळे संगणकावरील मराठीचे अस्तित्व अधिक ठळक झाले आहे; तर ‘विकिपीडिया’सारख्या जगन्मान्य इंटरनेट माहिती कोशानेही मराठीचा पर्याय उपलब्ध करून द्यावा यातच मराठीच्या श्रेष्ठत्वाचे गमक आहे. आज मराठीतील अनेक संकेतस्थळे इंटरनेटवर उपलब्ध आहेत. मुंबई विद्यापीठातील वैद्यक शिक्षणाच्या पहिल्या तुकडीला वैद्यक शिक्षण मराठीतून मिळाले होते अशी नोंद आहे. शेकडो वर्षांपूर्वी हिंदुस्थानी विद्वानांत शून्याचा शोध, वर्ग-वर्गमूळाची सूत्रे यासह वैद्यकीय क्षेत्रातही प्लॅस्टिक सर्जरी इ. खगोलशास्त्र, रसायनशास्त्र इ. विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली होती. तेव्हा काय इंग्रजी माध्यम होते? आज आघाडीवर असलेल्या अनेक मान्यवरांचेही प्राथमिक, माध्यमिक शिक्षण इंग्रजीतून झालेले नाही. ज्ञान ही एक विद्युतशक्ती मानले तर भाषा ही वीजवाहक तार आहे. तार म्हणजे वीज कधीच होऊ शकत नाही.
मराठी व्हावी ज्ञानभाषा
1996च्या महाराष्ट्र दिनापासून ‘मराठी’ राजभाषा झाली खरी, पण आजही कुसुमाग्रज म्हणतात तशीच म्हणजे ‘‘डोक्यावर राजमुकुट, पण अंगात फाटके कपडे घालून मराठी मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे’’ अशीच अवस्था आहे. शासनाने केवळ शासकीय कामकाजापुरतीच मराठी मर्यादित न ठेवता तिला ज्ञानभाषा करण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न केले पाहिजेत. ज्ञानार्जनासाठी, ज्ञानसंवर्धनासाठी, माहितीच्या आदान-प्रदानासाठी तिचा वापर वाढविला पाहिजे. हे शासनाचे घटनादत्त कर्तव्यच आहे; पण शासनच पहिलीपासून इंग्रजी माध्यम सेमी इंग्रजीला प्रोत्साहन देत आहे. मराठीचा आग्रह म्हणजे इंग्रजी वा अन्य भाषांचा अप्रीती, द्वेष, मत्सर, तिरस्कार नाही. आत्यंतिक अभिनिवेशही नको. दूराभिमानही नको. आवश्यकता असेल तिथे कोणत्याही भाषेतील योग्य शब्दही मराठीने स्वीकारले पाहिजेत. भाषा समृद्ध होण्याचा तोच मार्ग आहे. ज्यावेळी इंग्लंडवर फ्रेंचांचे राज्य होते त्यावेळी इंग्लंडचा कारभारही फ्रेंच भाषेतूनच चालत होता. पार्लमेंट, कोर्ट यांसह अनेक शब्द फ्रेंच आहेत. प्रारंभी अनेक शब्द इंग्रजांनाही परकीय भाषेतून घ्यावेच लागले. तसे घेताच त्यांनी मूळ शब्दांचे काही वेळा स्पेलिंग, उच्चार व अर्थही बदलविले. तेव्हा कुठे आपण जिला प्रगत समजतो ती ‘इंग्रजी’ तयार झाली. मग आपले हात कोणी बांधले? मुख्य म्हणजे आपण इंग्रजीवर किती काळ विसंबून राहायचे, तिचा किती उदो उदो करायचा, आपला न्यूनगंड किती काळ कुरवाळत बसायचा याचा आपण प्रथम विचार केला पाहिजे. मानसिक गुलामगिरी त्वरित झिडकारली पाहिजे.
राष्ट्रपित्याचाही विसर
आजचे राज्यकर्ते ऊठसूठ ज्या म. गांधींचा जप करतात त्या राष्ट्रपित्यानेही शिक्षणाच्या माध्यमाबाबत म्हटले होते, ‘‘शिक्षा का माध्यम अंग्रेजी होने के कारण शिक्षा प्राप्त करनेवाला बालकोंके बौद्धिक स्रोतपर इतना अधिक दबाव पडता हे कि उन्हे जो उच्च विचार विद्यालयोंद्वारा प्राप्त होते है उनको वो पचा नही पाते। अच्छे से अच्छे विद्यार्थी को भी उन्हे तोतेकी भाँती रटाने पढते है। समाज की सबसे बडी सेवा यही हो सकती है की, हमने अंग्रजी भाषा का अंधविश्वासपूर्ण सम्मान करना सीखा है, उससे स्वयंमुक्त हो और समाज को मुक्त करे।’’
विद्यापीठ शिक्षण आयोगासह आजपर्यंत नेमलेल्या जवळ जवळ सर्वच शिक्षण आयोगांनीही शिक्षणाचे माध्यम मातृभाषेलाच म्हटले आहे. भाषा म्हणून इंग्रजीवर आपण जरूर प्रभुत्व मिळवूया, पण सर्वांसाठी प्रथमपासून इंग्रजी माध्यमाचा स्वीकार मुळीच नको. यासाठी राष्ट्रहित लक्षात घेऊन राजकारण विरहीत कृती हवी. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की, देश भूगोलाने तयार होतो तर राष्ट्र हे भाषेतूनच साकारते. भाषा नष्ट झाली की, संस्कृतीही नष्ट होते. जगातली अनेक उदाहरणे याला साक्षी आहेत. तेव्हा राष्ट्रपेमी नागरिकांनो, आता तरी जागे व्हा. तुझे आहे तुजपाशी हे लक्षात घेऊन भावी पिढ्यांची ससेहोलपट थांबवूया.































































