
>>आसावरी जोशी
नुकतीच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वेक्षणानुसार जगातील सर्वात आनंदी देशांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये युरोपातील छोटासा देश फिनलंड प्रथम क्रमांकावर आहे आणि आपण 133 व्या स्थानावर आहोत. सर्व सुखसोयी.. सुबत्ता, समृद्धी असूनही आपल्यापासून आनंद एवढा लांब का गेलाय…?
आनंदाची , सुखाची व्याख्या काय…? काही मापदंड किंवा मोजमाप असते का आनंदाला.. मुळात आनंदात असणे आणि सुखात असणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लौकीर्थाने सुखी असणे म्हणजे.. सर्व सोयी – सुविधा.. हातात भरपूर खेळता पैसा.. छानछोकी.. उंची कपडे.. आलिशान घर..परदेश वाऱया.. परदेशात घर.. दागदागिने.. अनेक गाडया.. मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडणे.. नव्हे.. घडवून घेणे.. आणि इतर बऱयाच गोष्टी म्हणजे सामान्यतः सुखाची सरधोपट व्याख्या. पण या सगळ्या लांबलचक यादीत आनंद कुठे बसतो आहे का..? निखळ.. निर्मळ.. निर्भेळ आनंद! बऱयाच अतिश्रीमंत.. नवश्रीमंतांकडे वरील साऱ्याच गोष्टी अगदी मुबलक असतील.. नव्हे असतातच.. पण आनंद.., या साऱयांमध्ये सापडतो.. ? मोठे प्रश्नचिन्ह.
नुकतीच संयुक्त राष्ट्र संघाच्या एका सर्वेक्षणात जगातील सर्वात आनंदी देशांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये केवळ 55 लाख लोकसंख्या असलेल्या फिनलंड देशाने पहिला क्रमांक मिळविला आहे. इथले लोक जगातील सर्वात आनंदी लोक आहेत. त्यामध्ये बाहेरून भेट देणाऱया पर्यटकांचाही समावेश आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या यादीत आपला देश एकदम 133व्या स्थानावर मागे पडला आहे. आपल्याहून आनंदी नेपाळ आणि पाकिस्तान आहेत. गेल्या वर्षी या यादीत आपण 122व्या स्थानावर होतो. काय असेल आपला आनंद एवढा मागे जाण्याचे कारण…?
काही कमतरता आहे आपल्या देशात..? उद्योग.. व्यवसाय.. तंत्रज्ञान.. शिक्षण.. विकास.. समृद्धी.. सोयी सुविधा.. बुद्धिमत्ता.. साऱया साऱयांमध्ये आपण जगात आघाडीवर आहोत. पण मग आनंदाचे काय..
आपण जरा फिनलंड देशावर थोडी नजर टाकूया.
युरोपातील एक छोटासा देश.
येथे सूर्य 23तास प्रकाशमान असतो. अर्थात उन्हाळ्यात मध्यरात्रीचा सूर्य हा अनुभव येथे घेता येतो. रात्री 12 वाजेपर्यंत सूर्यास्त आणि पहाटे 3 वाजता सूर्योदय. म्हणजे दिवस मोठा आणि रात्र लहान.
हा देश सरोवरांचा देश म्हणून ओळखला जातो. येथे 2 लाखांपेक्षा जास्त लहान मोठी सरोवरे आहेत. सरोवरे खूप असल्याने बेटेही खूप आहेत.
येथील एक बेट फक्त स्त्रियांसाठी असून येथे केवळ स्त्रियांसाठी रीसॉर्ट, स्पा अशा सुविधा आहेत.
लॅपलँड ही फिनलंडमधील सर्वात थंड जागा. येथील एक चतुर्थांश भाग हा उत्तर ध्रुवाच्या बाजूला असल्याने येथे बहुतेकवेळा रात्र असते. मार्च ते जून या काळात उजेड असतो. येथे वर्षातील सुमारे 200 रात्री पोलर लाईट ज्याला नॉर्थन लाईट म्हणतात तो पाहता येतो.
फिनलंडमध्ये कोणीही बेघर नाही.
येथे गुन्हेगारी, भ्रष्टाचार जवळजवळ नाहीच.
नोकिया कंपनीचे मुख्य कार्यालय येथे आहे.
या देशाने जगाला पहिला वेब ब्राउझर दिला आहे.
येथे कोणत्याही प्रदूषणाला थारा नाही. प्रत्येक 10 प्लास्टिकच्या बाटल्यांपैकी 9 रिसायकल केल्या जातात.
येथील शिक्षणव्यवस्थेचे पाठ अमेरिकाही घेण्याच्या तयारीत आहे.
या देशात शाळेची धास्ती नाही. गुणांची आणि कॉपीची चढाओढही नाही.
येथे मुलांना अभ्यासासाठी, शिकण्यासाठी वर्गात बसणे बंधनकारक नाही.
मुलांना विचार कसा करायचा हे शिकवले जाते.
येथे कोणतीही मोठी, महत्वाची परीक्षा नाही.
या देशात शिक्षकांवर प्रचंड विश्वास ठेवला जातो. आपल्याकडे एखाद्या डॉक्टरला जेवढा पगार दिला जातो तेवढाच तिथे शिक्षकांना मिळतो.
शिक्षक होण्यासाठी आणि घडविण्यासाठी विशेष मेहनत घेतली जाते.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे शिक्षक होणे अतिशय प्रतिष्ठsचे समजले जाते.
मुलं सात वर्षांपर्यंत शाळेत जात नाहीत. त्यानंतरही शाळा दोन किंवा तीन तासांपेक्षा जास्त नसते. एखादा विद्यार्थी अभ्यासात मागे पडत असेल तर तो शिक्षकांचा दोष समजला जातो. विद्यार्थ्यांचा नव्हे. त्याची शिक्षकाला कारणे द्यावी लागतात.
मला वाटते शिक्षणाच्या, तंत्रज्ञानाच्या, पर्यटनाच्या, उद्योगाच्या सर्वात महत्वाचे म्हणजे बुद्धिमत्तेच्या बाबतीत आपण अत्यंत उजवे आहोत. मग आनंदाची कमतरता कुठे येते. थोडेसे विश्लेषण करूया.
येथे मला आपल्या कोणत्याही गोष्टीवर उगीच टीका अजिबात करायची नाही. पण तरीही काही गोष्टी खटकतात.. ज्या आपल्यापैकीच काहीजण करतात. आणि मग आपण विनाकारण टीकेस पात्र होतो.
खूप मोठा आणि खंडप्राय असा आपला देश आहे. भरपूर लोकसंख्या असलेला. त्यामुळे येथे चुकीच्या मानसिकतेला, भ्रष्टाचाराला वावही खूप मिळतो. अजूनही आपल्या देशात स्त्रियांची सुरक्षितता हा प्रश्न ऐरणीवर आहे. या मानसिकतेचे परिणाम अगदी परदेशी पर्यटकांनाही भोगावे लागतात. छोटया छोटया गोष्टीत भ्रष्टाचार, नियमांना बगल देऊन पुढे जाणे, निसर्ग, पर्यावरण ही आपली वडिलोपार्जित मालमत्ता आहे अशी स्वतःची गैरसमजूत करून घेणे. अगदी रहदारीचे, स्वच्छतेचे प्राथमिक नियम मोडण्यात मनमानीचा आनंद मिळविणे, कायदा, नियम हे मोडण्यासाठीच असतात या समजुतीत राहणे.. अर्थात ही आपली यादी खूपच लांबत जाईल. पण खरेच हा प्रश्न पडतो की सर्व सुखसुविधा, सुबत्ता, नितळ, देखणा निसर्ग, त्याचे भरभरून बहुरंगी दान मिळत असूनही आपण आनंदाच्या बाबतीत एवढे मागे का…
मला वाटते आपल्यापैकी प्रत्येकानेच हा प्रश्न स्वतःला विचारून पाहणे खूप खूप गरजेचे आहे. कारण स्वतःशीच प्रामाणिकपणे विचार केला की बहुतेक प्रश्नांची खूप खरी उत्तरे मिळतात.. आनंद मिळविण्याची सुरुवात ही नेहमी स्वतःपासूनच होत असते. कारण कोणताही देश, राज्य हे sआधी माणसांनी बनत असते..
आपण कितीसा वेळ स्वतःसाठी देतो? आपल्या आवडत्या माणसांसाठी देतो.?
सकस आहार, नियमित व्यायाम, शिस्तबद्ध जीवनशैली हा कोणत्याही आनंदी जगण्याचा पाया आहे.
रहदारीचे, प्राथमिक सार्वजनिक स्वच्छतेचे, वाहतुकीचे, प्रदूषणमुक्तीचे नियम आपण पाळतो?
होईल तेवढी दुसऱयांना मदत करतो की मत्सर, हेव्यादाव्यात कुढत बसतो.?
शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी नेहमी अभ्यासाच्या, उत्तीर्ण होण्याच्या , अत्यंत कठीण परीक्षांना सामोरे कसे याच विवंचनेत कायम का असतात?
अतिशय सुंदर निसर्ग, बहुरंगी वन्यजीवन आपल्याला सहज लाभले असूनही हे सारे वैभव कायम संकटात का असते?
भलामोठा, विस्तीर्ण समुद्रकिनारा आपल्याला लाभला असूनही तो आत्यंतिक प्रदूषित आणि दुषित आहे.. असे का व्हावे?
आपल्या घरांना वृद्धाश्रमाची गरज का पडावी?
आपसात संवाद, शुभेच्छा केवळ सामाजमाध्यमे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानेच का व्हावा?
हे खूप प्राथमिक आणि मुलभूत प्रश्न आहेत. ही प्रश्नांची यादी अजून खूप लांबत जाईल. या साऱया प्रश्नातच आपल्या आनंदाची छोटीशी किल्ली हरवली आहे. आणि कोणीतरी येऊन ती शोधून देण्याची वाट बघत बसण्यापेक्षा आपणच हे प्रश्न स्वतःपासूनच सोडविण्यास सुरुवात केली तर आनंद शोधण्याची किंवा मापण्याची गरजच पडणार नाही.. तो आपल्यापैकी प्रत्येकाकडे असेल.. अगदी प्रत्येक घरात…




























































