अयोध्येत ‘राम रसोई’ची सुरुवात; भाविकांना मिळणार मोफत भोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येत राम रसोईची सुरुवात करण्यात आली आहे. रामलला मंदिराबाहेर अमावा मंदिरात पाटण्यातील महावीर मंदिर ट्रस्टने रविवारी राम रसोईची सुरुवात केली. आता अयोध्येत रामललाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना मोफत भोजन मिळणार आहे. महावीर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष किशोर कुणाल यांनी रविवारी याची सुरुवात केली आहे. महावीर ट्रस्टने राम मंदिर निर्माणासाठी 10 कोटींची देणगी देण्याचीही घोषणा केली आहे.

अयोध्येत राम रसोई सुरू करण्यासाठी बिहारच्या मोकरी गावाहून 60 क्विंटल गोंविदभोग आणि कतरणी तांदूळ मागवण्यात आल्याचे कुणाल यांनी सांगितले. राम रसोई आणि रामललाच्या नेवैद्याची सेवा अखंडपणे सुरू राहील असेही ते म्हणाले. याबाबत अयोध्येतील मुख्य पुजाऱ्यांशी बोलणे झाल्याचेही त्यांनी सांगितले. बिहारच्या सीतामढीमध्ये सीता रसोई चालवण्यात येते. या ठिकाणी दिवसा 500 तर रात्री 200 भाविकांना मोफत भोजन देण्यात येते. आता अयोध्येत सुरू झालेल्या राम रसोईत दररोज एक हजार भाविकांना मोफत भोजन देण्यात येणार आहे. त्यानंतर भाविकांच्या वाढणाऱ्या संख्येनुसार भोजनाची सेवा वाढवण्यात येणार असल्याचे कुणाल यांनी सांगितले.