नितीश कुमारांचा भाजपला धक्का, बिहारमध्ये नाही लागू होणार NRC

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून ईशान्येकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. याचे पडसाद संपूर्ण देशात दिसून येत असून छत्तीसगढ, पंजाब, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ अशा राज्यांनी या विधेयकाला विरोध केला आहे. आता यात आणखी एका राज्याची भर पडली आहे. नितीश कुमार यांनी बिहारमध्ये एनआरसी लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. जदयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी याबाबत सांगितले आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला जदयूने लोकसभा व राज्यसभा दोन्ही भवनात पाठिंबा दिला होता. त्यावरून जदयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर नाराज झाले होते व त्यांनी या विधेयकावर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी शनिवारी संध्याकाळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. त्यावेळी नितीश कुमार यांनी एनआरसी बिहारमध्ये लागू करणार नाही असा शब्द दिला असल्याची माहिती प्रशांत किशोर यांनी पत्रकारांना दिली आहे.