मुंबईसह नऊ जिल्हे चिंताजनक; नांदेड, बीडमध्ये 10 दिवसांचा लॉकडाऊन, परभणीत संचारबंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये तर कहर झाला आहे. महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. देशात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या 20 जिह्यापैकी 9 जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. त्यात मुंबईसह पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, नांदेड, जळगाव, अकोला जिह्याचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात कोविड विषाणूचे दोन नवे स्ट्रेनही सापडल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. नांदेडमध्ये 25 मार्चपासून कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे तर परभणीत 1 एप्रिलपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्रात मंगळवारी चोवीस तासांत 28 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्येच्या बाबतीत पंजाब दुसऱया क्रमांकावर आहे असे भूषण यांनी सांगितले. पंजाबमधील जालंधर, एसएएस नगर, लुधियाना, पटियाला आणि होशियारपूर या जिह्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत असे त्यांनी पुढे सांगितले.

गुजरात आणि मध्य प्रदेशातही दिवसाला दीड हजारांवर रुग्ण सापडत आहेत अशी माहिती भूषण यांनी दिली. गुजरातमध्ये सूरत, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि भावनगर तर मध्य प्रदेशात भोपाळ, इंदूर, जबलपूर, उज्जैन आणि बेतूल या जिह्यांमध्ये जास्त रुग्ण आहेत.

कोविड विषाणूचे 771 प्रकार आढळले

देशातील 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड विषाणूचे 771 प्रकार आढळल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर डिजिस कंट्रोलचे संचालक एस. के. सिंग यांनी दिली. 736 पॉझिटिव्ह नमुन्यांमध्ये ब्रिटनचा स्ट्रेन आढळल्याचे त्यांनी सांगितले. कोविड विषाणू आता आपले स्वरुप बदलू लागल्यानेच काही राज्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढताना दिसत असल्याचा दावाही त्यांनी केला.

ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझीलचा स्ट्रेन घातक

कोविड विषाणूमध्ये ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील हे तीन स्ट्रेनच घातक आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये अन्य स्ट्रेनही आढळले असून त्यांची अधिक चाचणी केली जात आहे असे सिंग यांनी सांगितले.

नांदेडमध्ये कडक लॉकडाऊन

नांदेड जिह्यात  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 25 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागरिक कोरोनाचे नियम पाळत नसल्याने हा लॉकडाऊन करण्याची वेळ आल्याचे जिह्याधिकाऱयांनी म्हटले आहे.

बीडमध्ये 10 दिवसांचा लॉकडाऊन

बीड जिह्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 4 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन कायम राहणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता जिह्यात त्यादरम्यान कडकडीत बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी सांगितले.

परभणीत कडक संचारबंदी

परभणी जिल्ह्यात आज सायंकाळी सात वाजल्यापासून कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. 1 एप्रिलच्या सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी राहणार आहे. त्यादरम्यान किराणा, भाजीपाला, दूधविक्री, खत बियाणे दुकाने बंद राहणार आहेत. मात्र किराणा सामान आणि दूध घरपोच पुरवले जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

रुग्णसंख्येकरून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव

अन्य राज्यांत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रॅली, प्रचारसभा, मिरवणुका सुरू आहेत. मात्र  तेथील आकडेवारी का समोर आणली जात नाही? कोरोनाबाबत महाराष्ट्राला बदनाम करण्याचा केंद्र सरकारचा डाव तर नही ना, अशी शंका व्यक्त करीत आज मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

लॉकडाऊनचा विचार नाही!

कोरोना रोखण्यासाठी मुंबईकरांनी आतापर्यंत सहकार्य केले आहे. मात्र सद्यस्थितीत रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून काळजी-खबरदारी घेतल्यास कोरोना नियंत्रणात येईल. यासाठी निर्बंध कडक करण्यात येत असून आवश्यक व्यवस्था उभारण्यात येत असून चाचण्या व लसीकरणावर भर देण्यात येत आहे. यात यश येईल असा विश्वास व्यक्त करताना सद्यस्थितीत लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नसल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले.